(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील एका प्रौढ महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी टुनटुनकुमार रामप्रवेश महतो याला चिपळूण सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन २०१९ मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागला असून, आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अन्वये जन्मठेप आणि एक हजार रुपयांचा दंड, तर कलम ३०७ अन्वयेही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या सश्रम कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
सन २०१९ मध्ये पावसाळ्याच्या दिवसांत गुहागर तालुक्यातील एक प्रौढ महिला गावाबाहेरील शेतात काम करीत होती. दुपारच्या सुमारास परिसरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महिला पायवाटेने गावाच्या दिशेने निघाली असता आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तिचे दोन्ही हात दोरीने बांधून कपड्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. महिला निपचित पडल्याचे समजून आरोपीने तिच्या अंगावर जंगली झाडाझुडपांच्या फांद्या टाकल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने घडलेला प्रकार नातेवाईक, पोलीस पाटील आणि गावातील नागरिकांना सांगितला. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे ग्रामस्थांनी आरोपीचा शोध सुरू केला. गावाबाहेर गॅस कंपनीच्या पाइपलाइनचे काम सुरू असलेल्या परिसरात आरोपी आढळून आला. ग्रामस्थांनी त्याला पकडून पीडित महिलेपुढे आणले असता तिने त्याची ओळख पटवली. त्यानंतर पीडितेने गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास अधिकारी संदीप पाटील यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३०७, ३४१ आणि ३४२ अन्वये दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केला. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे चिपळूण सत्र न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास, तर कलम ३०७ अन्वये जन्मठेप आणि दंड न भरल्यास एक महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम ३४१ आणि ३४२ अन्वये प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पीडित महिलेने दाखवलेले धैर्य, तपास यंत्रणेने केलेला तपास आणि सरकार पक्षाने न्यायालयात मांडलेली बाजू महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील अनुपमा ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना गुहागर न्यायालयाचे कोर्ट पैरवी अधिकारी ए. एस. शिंदे यांनी सहकार्य केले.


