(नाशिक)
महिलांवर अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या ‘भोंदू कॅप्टन’ अशोक खरात याला आज (दि. २४) पोलीस कोठडी संपल्यानंतर दुपारी ३.५० वाजता नाशिक सत्र न्यायालय येथे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची म्हणजेच २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी वकिलांनी सांगितले की, खरातविरोधात ठोस पुरावे असून अनेक पीडित महिला आता पुढे येत आहेत. त्यामुळे तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने पोलीस कोठडी वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
नरबळीचा संशय, शस्त्रसाठा आणि गूढ विधींचा तपास
सरकारी वकिलांनी न्यायालयात धक्कादायक माहिती मांडताना सांगितले की, खरातकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्याच्याकडे २१ जिवंत आणि ५ वापरलेली काडतुसे सापडली आहेत. याशिवाय, त्याने पाच जणांचा नरबळी दिल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला.
तपास यंत्रणेसमोर अनेक प्रश्न
तो वापरत असलेले खडे आणि मिश्रित पाणी कुठून आणले जात होते? ‘सिद्ध दोष पूजा’च्या नावाखाली दाखवले जाणारे वाघ आणि साप खरे होते की बनावट? तसेच तो वापरत असलेली कस्तुरी हरणाच्या शिकारीतून मिळवली होती का? या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
दुसरीकडे, खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केला. त्यांनी तपासातील काही विसंगतींचा मुद्दा उपस्थित करत, “लॅपटॉप आणि डीव्हीआरचा उल्लेख आहे, पण पेनड्राईव्हचा उल्लेख का नाही?” असा सवाल केला. पिस्तूल परवानाधारक असल्याचा दावा करत, पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले.
न्यायालयात खरातची प्रतिक्रिया
सुनावणीदरम्यान अशोक खरात शांतपणे मान खाली घालून बसलेला होता. न्यायाधीशांनी विचारले असता, “मला साप आणि वाघ याबद्दल काही माहिती नाही,” असे त्याने सांगितले.
दैवी शक्तीचा बनाव करून आणि भविष्याची भीती दाखवत महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे सोमवारी (दि. २३) आणखी तीन महिलांनी तक्रार दाखल केली. त्यामुळे एकूण गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली असून प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे.
घरात सापडले रोख पैसे आणि साहित्य
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, खरातच्या घरातून सुमारे ६ लाख ५३ हजार रुपयांची रोख रक्कम, लॅपटॉप, काळ्या रंगाची रिव्हॉल्व्हर, राजमुद्रा आणि एकूण ३१ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच महिलांना गुंगी आणण्यासाठी मधामध्ये काही पदार्थ मिसळून त्यांचा गैरवापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
महिलांवरचे विधी हे बहुधा मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक बाबीचा बारकाईने तपास सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

