गत् पस्तीस वर्षे सातत्याने लेखनात रमणारे कोकणातील लेखक जे.डी. पराडकर यांचा ‘कोकणची माणकं’ हा व्यक्तिचित्रणाचा संग्रह प्रकाशक घनश्याम पाटील चपराक प्रकाशन पुणे यांनी अत्यंत मनमोहक स्वरुपात प्रकाशित केला आहे. तसं पाहिलं तर व्यक्तिचित्रण हा साहित्यप्रकार अवघड आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण एखाद्या व्यक्तिला समोर ठेवून त्याचे गुणदोष, लकबी लिहिताना अत्यंत काटेकोरपणे लिहावे लागते. कारण सद्य सामाजिक परिस्थिती लक्षात घेता एखादा शब्दही वेगळा प्रकार घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. पराडकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण नि तटस्थपणे कोकणातील अनेक व्यक्ती वाचकांपुढे उभ्या केल्या आहेत.
व्यक्ती तितक्या प्रकृती नि प्रकृती तितक्या विसंगती असे असताना पराडकरांची लेखणी कुठेही वास्तवतेची कास सोडत नाही. हे त्यांचं कसब वाखाणण्याजोगे आहे. ह्या व्यक्तिरेखा साकारताना सर्व थरातील व्यक्तिमत्त्व अगदी शाळेतील मुलीपासून ते शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या आजोबांविषयी लिहिले आहे. ‘गजाभाऊ’ या लेखात गजाभाऊ मोरे यांच्याविषयी लेखकाने आदरयुक्त भावाने लिहिले आहे. त्यांची शरीरयष्टी, त्यांचा स्वभाव, त्यांचा पोशाख, गजाभाऊंच्या हॉटेलमधील पदार्थ यांच्या वर्णनातून गजाभाऊ वाचकांपुढे उभे करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. संगमेश्वर येथे होणाऱ्या नाटकासाठी कसबा येथील काही महिला आणि मुलं जात असत. तेव्हा दिवसभर हॉटेल व्यवसायात रमलेले गजाभाऊ त्यांची बैलगाडी घेऊन तयार असत. इच्छित स्थळी बैलगाडी पोहोचली की सारे नाटक पाहायला जात. तेव्हा गजाभाऊ बैलगाडीत आराम करत असत. केवळ इतरांच्या छंदाला जोपासणारा गजाभाऊ वाचताना गजाभाऊ विषयी मनात आदर निर्माण होतो.
कसबा गावी लेखक पराडकर शिकत असताना त्यांच्या शाळेत लेले नावाचे माध्यमिक शिक्षक होते. विशेष म्हणजे लेले यांची पत्नी रेखाताई याही त्याच शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. या कुटुंबाविषयी लेखकाने अत्यंत जवळकीच्या नात्याने लिहिले आहे कारण दोन्ही कुटुंबात अत्यंत जिव्हाळा होता. या जिव्हाळ्याबद्दल लेखक फार छान व्यक्त होतात,’स्नेह जुळायला रक्तातच नातं असायला लागतं, असं काही नाही. मनानं तुम्ही एकमेकांच्या किती जवळ येता, यावर नात्यांची वीण ठरलेली असतं.’ अशी वाक्यं पेरताना भावे प्रयोग नि छडी प्रयोग, छडी नि जीवनातील घडी, नोकरी नि छोकरी असे काही शब्दप्रयोगही पराडकरांनी उत्तमरीत्या जुळविले आहेत. लेखक आणि लेलेसर यांच्यामध्ये परीक्षेत रंगलेला प्रसंग हृदयाला भिडणारा आहे.
सतीश मधुसूदन डिंगणकर या ज्योतिष्यकाराचे व्यक्तिमत्त्व जे.डी. यांनी योग्यप्रकारे ‘संख्याशास्त्र’ या लेखात चितारले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या व्यक्तिचे निर्भीडपणे भविष्य सांगणारे डिंगणकर त्याबाबत कधीच मोबदला घेत नसत, हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य लेखकाने नमूद केले आहे. आज लेखक पराडकर लेखनाच्या प्रांगणात जो यशस्वी विहार करीत आहेत त्याची बीजं डिंगणकर यांनी रोवली असल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख लेखक करतात.
‘प्रभूची माया’ हे व्यक्तिचित्रण एक अत्यंत वेदनादायी आहे. अरुणा आणि तिच्या संसाराची वेदनादायी कहाणी वाचताना गलबलून येते. अरुणा आणि अनंत यांच्या संसारवेलीवर गीता, शमा या दोन मुली आणि प्रभू हा मुलगा ही गोंडस फळे लागलेली असताना पती प्रकृतीने अशक्त असल्याने संसाराचा भार अरुणावर जास्त पडत असे परंतु ती डगमगता तो संसाराचा गाडा हाकत राहते. ‘कष्टकऱ्यांच्या मागे देवही हात धुऊन लागतो.’ ही गोष्ट या कथेत प्रामुख्याने जाणवते. अशा कठीण परिस्थितीतही प्रभू नोकरीसाठी परदेशात जातो ही गोष्ट तशी स्वप्नवत! प्रभू घरी पैसे पाठवतो. अरुणा टुमदार घर बांधते परंतु त्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळतो. ते आलेले अकल्पित संकट, त्यामुळे अरुणाची स्थिती वाचताना डोळे पाणवतात.
‘चिरंजीव समाजसेवक’ या व्यक्तिचित्रणातील व्यक्ती शशी सप्रे यांच्या एकूण कार्याचा आढावा लेखक पराडकर यांनी आदरपूर्वक घेतला आहे. या लेखातील एक वाक्य मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. नात्याची वीण घट्ट असली की, बोलताना समोर नसलेल्या व्यक्तिच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे दिसते. या अर्थाने लेखक लिहितात, ‘शशीकाकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर मला दिसली. आमचं संभाषण जरी फोनवरचं असलं तरी दोन्ही हृदय एकाच कामासाठी जोडलेली होती. त्यामुळे नकळत एकमेकांचे चेहरे डोळ्यासमोर आपोआप उभे राहायचे.’ थोडेसे आगळेवेगळे वाटणारे शीर्षक दिल्यामुळे वाचकांची त्याबाबतीत उत्सुकता वाढते. वाचक जसजसा हा लेख वाचत जातो, तसतसा त्याचा शशी सप्रे यांच्याबद्दलचा आदर दुणावत जातो.
आजकाल सर्वत्र फसवणुकीचे प्रकार वाढत जाताहेत. आपल्या कामाप्रती, ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्या यजमानाप्रित्यर्थ निष्ठा असणे दुर्मिळ होत चालले आहे. काम करताना सापडलेले पैसे, दागिने परत करणे हे प्रकार फार कमी वेळा लक्षात येतात. परंतु, जिथे काम करतो ते कुटुंब आर्थिक अडचणीत असताना मोलमजुरी करून जमवलेली रक्कम कुटुंबाला देणारी ‘शुभांगीमामी’चे चित्र लेखक पराडकर यांनी अत्यंत जिव्हाळ्याने प्रस्तुत केले आहे. अशा व्यक्ती आजही आहेत म्हणून प्रामाणिकपणा नि आपलेपणा तसेच निष्ठा या बाबींना महत्त्व आहे. अत्यंत वाचनीय नि अनुकरणीय, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे शुभांगीमामी!
‘कष्टाची भाकरी’ खाताना कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळूनही अनिल नावाच्या तरुणाने स्वतःला तसेच कुटुंबाला कसे सावरले ते सारे वाचताना मन सैरभैर होते. अनिल नावाच्या तरुणाचा दगडं फोडण्याचा व्यवसाय असल्याने प्रकृती मजबूत असते, शरीर धडधाकट असते. परंतु अशाच माणसाच्या मागे दुर्दैव हात धुऊन लागते. एका अपघातात अनिल एक हात व एक पाय गमावून बसतो. कष्ट करताना केवळ शरीर नव्हेतर मनही मजबूत झालेले असल्यामुळे अनिल येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला ठामपणे सामोरा जातो. हे वर्णन लेखकाने अत्यंत तळमळीने केले आहे.
‘बुद्धिमत्ता ही आपल्या संस्कार आणि वाचनावर अवलंबून असते. आपण आपले ज्ञान किती आणि कशा पद्धतीने वाढविण्याचा प्रयत्न करतो त्यावर त्याची उंची ठरत जाते. एखादी बाब अथवा मुद्दा समजून घेण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. अपूर्ण माहितीवर आपण हे मुद्दे समजून घेऊ शकत नाही. यासाठी आपल्यालाच माहितीचे सारे स्त्रोत धुंडाळावे लागतात. ज्ञान वाढविण्याची आवडही असावी लागते. माहिती नसलेल्या मुद्यावर बोलताना काही वेळातच आपल्या ज्ञानाची मर्यादा लक्षात येते. याउलट एखाद्या मुद्यावर आत्मविश्वासाने आणि विविध उदाहरणांचे दाखले देत एखादी व्यक्ती बोलू लागली तर त्याचे बोलणे ऐकत राहावे असेच वाटते. त्या व्यक्तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास हेच त्याच्या समृद्ध ज्ञानाचे प्रतीक असते…’ किती सुंदर विवेचन केले आहे, लेखक पराडकर यांनी! ‘श्रीनिवास’ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना या वाक्याची सुरुवात, म्हणजे लेखक या वाक्याच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांवरील तज्ज्ञांना एकप्रकारे सणसणीत चपराक देऊ इच्छितात. श्रीनिवास यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा नि त्या ज्ञानाचे सुयोग्य वापर करणाऱ्या श्रीनिवास यांच्याबद्दल पराडकरांनी कुठेही हातचे राखले नाही.
‘मला आय.ए.एस. व्हायचंय’ या जिद्दीने पेटून उठलेल्या क्रिशा कपिल इंदानी हिच्या स्वभावाचे, कष्टाचे, तिच्यावर झालेल्या संस्काराचे यथायोग्य मूल्यमापन लेखकाने या लेखात केले आहे. यामागे लेखकाची भूमिका इतर गुणी, अभ्यासू तरुणाईला मार्गदर्शकाची आहे. क्रिशाच्या अभ्यासू वृत्तीचा उल्लेख करताना तिच्याकडे असलेल्या असंख्य चांगल्या गुणांनाही लेखक आवर्जून मांडतात. मेहनत, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम या जोरावर क्रिशा तिचं ध्येय निश्चित गाठेल हा विश्वास नक्कीच सार्थ ठरणार आहे.
आपल्याकडे चांगल्या नावाचा अपभ्रंश करण्याची एक परंपरा आहे. लहानपणीच अपभ्रंश झालेले नाव माणूस अगदी आजोबा झाले तरी काही व्यक्तिंच्या तोंडी येते. यातून या संग्रहातील माणकंही सुटली नाहीत. विन्या, पुंड्या, राम्या, बट्ट्या, चिंत्या ही नावे अशी असली तरीही त्यांचे कार्य असामान्य आहे, इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
लेखक जे.डी.पराडकर यांनी ‘कोकणची माणकं’ या पुस्तकात ज्या-ज्या माणकांचा गौरवपूर्ण, अनुकरणीय, मार्गदर्शक अशा गुणांचा, कार्याचा उल्लेख केला आहे, त्या सर्व व्यक्तिंशी लेखकाचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. व्यक्ती संपर्कात येताच त्याच्या गुणांची नि कार्याची नोंद घेऊन लगेच शब्दबद्ध करून समाजापुढे मांडण्याची त्यांचा स्वभावधर्म कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे. या संग्रहातील सर्व माणकांना न्याय देणं मी स्वतः घालून घेतलेल्या शब्द संख्येच्या मर्यादेमुळे शक्य झाले नाही…!
__________________________
▪️ कोकणची माणकं : व्यक्तिचित्रण
लेखक : जे.डी.पराडकर
प्रकाशक :घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन,
पुणे
७०५७२९२०९२
परीक्षण : नागेश शेवाळकर, लेखक, पुणे ९४२३१३९०७१

