(मुंबई / रत्नागिरी)
राज्यात भोंदूबाबा, ज्योतिषी आणि अघोरी प्रथांच्या आडून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक, मानसिक तसेच सामाजिक शोषण वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) यांनी आता अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या तथाकथित बाबांची जिल्हानिहाय यादी तयार करून ती संबंधित पोलिस यंत्रणेकडे सुपूर्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समितीने घेतला आहे.
या संदर्भात अंनिसच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक, भयप्रद विधी आणि मानसिक छळाच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ज्योतिषी अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धेच्या आडून होणाऱ्या शोषणाचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे अंनिसने नमूद केले आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांकडे सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख भोंदूबाबा, त्यांची कार्यपद्धती आणि कथित गैरकृत्यांचे पुरावे संकलित करण्यात येत असून, हे सर्व दस्तऐवज संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लवकरच सादर केले जाणार आहेत.
या प्रकरणांचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी ठोस आणि प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी अंनिसने केली आहे. नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी नोंदवाव्यात, यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित करण्याची आवश्यकता देखील समितीने अधोरेखित केली आहे.
या सर्व मागण्यांचे निवेदन राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, त्याची प्रत मुख्यमंत्री कार्यालयालाही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पीडित नागरिकांना मदत मिळावी यासाठी अंनिसने हेल्पलाइन सुरू केली असून, ७५८८८०६६८८, ८०८७८७६८०९ तसेच महिलांच्या शोषणासंदर्भात ९४२२३०५९२९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

