(दापोली)
दापोली तालुक्यातील वाघिवणे परिसरातून तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अखेर जंगलमय भागात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीर्घकाळ शोध सुरू असतानाच समोर आलेल्या या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत व्यक्ती सुरेश जयराम कदम (वय ६२, रा. वाघिवणे, पो. इळणे, ता. दापोली) हे १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आजारपणामुळे अशक्त अवस्थेत घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते गावातील स्मशानभूमीकडील भागात गेल्याचे समोर आले; मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. याबाबत मुलगा सुजित सुरेश कदम यांनी दापोली पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानुसार नापत्ता नोंद क्रमांक ५१/२०२५ अंतर्गत २० डिसेंबर रोजी नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, २० मार्च रोजी सायंकाळी वाघिवणे येथील लोढयाचा वाडा परिसरातील जंगलमय भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार आजारपणामुळे अशक्त अवस्थेत जंगलात पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक २९/२०२६ अंतर्गत नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. दीर्घकाळ बेपत्ता राहिलेल्या व्यक्तीचा अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने गावात शोककळा पसरली आहे.

