( रत्नागिरी /प्रतिनिधी )
रत्नागिरी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी बहुचर्चित प्रभाग आरक्षण सोडत अखेर घोषित झाली असून, सोडतीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवक निवडून येणार असून, विविध सामाजिक प्रवर्गांमध्ये आरक्षणाचे वाटप करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीनुसार काही प्रभाग महिला आरक्षित तर काही सर्वसाधारण व मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या गणितांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रभागनिहाय आरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले :
प्रभाग १ अ — सर्वसाधारण स्त्री, १ ब — सर्वसाधारण;
प्रभाग २ अ — सर्वसाधारण स्त्री, २ ब — सर्वसाधारण;
प्रभाग ३ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, ३ ब — सर्वसाधारण;
प्रभाग ४ अ — सर्वसाधारण महिला, ४ ब — सर्वसाधारण;
प्रभाग ५ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ५ ब — सर्वसाधारण महिला;
प्रभाग ६ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ६ ब — सर्वसाधारण महिला;
प्रभाग ७ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ७ ब — सर्वसाधारण महिला;
प्रभाग ८ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, ८ ब — सर्वसाधारण;
प्रभाग ९ अ — अनुसूचित जाती सर्वसाधारण, ९ ब — सर्वसाधारण महिला;
प्रभाग १० अ — सर्वसाधारण महिला, १० ब — सर्वसाधारण;
प्रभाग ११ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ११ ब — सर्वसाधारण महिला;
प्रभाग १२ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, १२ ब — सर्वसाधारण;
प्रभाग १३ अ — सर्वसाधारण महिला, १३ ब — सर्वसाधारण;
प्रभाग १४ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, १४ ब — सर्वसाधारण;
प्रभाग १५ अ — नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, १५ ब — सर्वसाधारण;
प्रभाग १६ अ — सर्वसाधारण महिला, १६ ब — सर्वसाधारण.
सोडती जाहीर होताच संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चांना उधाण आले असून, काही प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांची राजकीय समीकरणे धोक्यात आली आहेत. विशेषतः मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव झालेल्या प्रभागांत नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आरक्षण सोडतीची ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचा प्रशासनाचा दावा असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक नेत्यांनी आता आपल्या पक्षीय रणनीतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत रत्नागिरीतील राजकीय तापमान आणखी चढणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

