(डोंबिवली/कल्याण)
रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपीने तीन वेगवेगळी नावे वापरून महिलेला फसवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालय यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल
तक्रारीनुसार, आरोपीने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेला घरी बोलावले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीने फोटो आणि व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला दीर्घकाळ ब्लॅकमेल केले. या धमक्यांच्या जोरावर काही वर्षे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पतीकडून 10 लाखांची फसवणूक
आरोपीने पीडितेच्या पतीला रेल्वेचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 10 लाख रुपये उकळले. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांशी चर्चा केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. पत्नीने आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहितीही पतीला दिली. यामुळे पतीला जबर मानसिक धक्का बसला. पीडित दाम्पत्याने तक्रार दिल्यानंतर रामनगर पोलीस ठाणे येथे 8 मार्च रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
व्याजाच्या पैशातून महिलांचे शोषण?
आरोपी व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्जाच्या वसुलीसाठी तो महिलांकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचे गंभीर आरोप काही महिलांनी केले असून, त्यांनीही पोलिसांकडे धाव घेतली आहे. व्याजावर पैसै वसूल करण्याच्या बदल्यात महिलांकडे शरीर सुखाची मागणीही केल्याचा धक्कादायक प्रकार या आरोपीनं केल्याचं उघडकीस आलंय.
आरोपीने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती फिर्यादीचे वकील महेश शिवदास यांनी दिली. दरम्यान, आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

