(कल्याण/बदलापूर)
श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या प्रकरणात मृणाल जाधव हिला मोठा धक्का बसला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने ती सध्या आधारवाडी कारागृह येथेच राहणार आहे.
वादग्रस्त व्हिडिओनंतर गुन्हा दाखल
२७ फेब्रुवारी रोजी मृणाल जाधव हिने श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या.दरम्यान बदलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई करत जाधव हिला अटक केली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृणाल जाधव हिचे आई-बाबा दोघेही भाजपचे सक्रिय नेते आहेत. बदलापूर भाजप पूर्व शहर अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची ती मुलगी आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या २३ दिवसांपासून मृणाल न्यायालयीन कोठडीत आहे. जाधव हिने यापूर्वी अंबरनाथ न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज केला होता; मात्र तो अर्जही फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तिने कल्याण जिल्हा सत्र न्यायालय येथे पुन्हा अर्ज दाखल केला. सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा अर्जही नामंजूर केला.
या प्रकरणी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष राणी जवळेकर यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या वतीने वकील रेश्मा भोपी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, जाधव हिला जामीन मिळाल्यास तपास प्रक्रियेत हस्तक्षेप होऊ शकतो. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला.
दरम्यान, २६ मार्च रोजी रामनवमी साजरी होत असताना हा निर्णय आल्याने संबंधित संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

