(मुंबई)
राज्यात अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले की, भेसळ करणाऱ्यांविरुद्ध आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अन्नसुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि संघटित भेसळ रॅकेट्सवर अंकुश ठेवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात डॉ. मनिषा कायंदे यांनी अन्न भेसळीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. यावेळी भाई जगताप, अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत चर्चेत सहभाग घेतला.
‘भेसळ हा संघटित गुन्हा’ – झिरवाळ
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, “अन्न भेसळ ही साधी फसवणूक नाही, तर संघटित गुन्हेगारीचे रूप आहे. अशा रॅकेट्सवर मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.”
वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या छाप्यांमध्ये दुधातील भेसळ उघडकीस आली. या प्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी चार जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, अलीकडेच १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच फ्लेवर्ड सुपारीच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.
भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने सरकारने कठोर धोरण अवलंबले आहे. मकोकासारख्या कायद्याची अंमलबजावणी केल्यास भेसळ करणाऱ्या टोळ्यांवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

