(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत बळीराम परकर विद्यालयात वय वर्ष 9 ते 14 मधील मुलींच्या पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये मुलींना HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीचे महत्त्व, गरज आणि सुरक्षितता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लसीकरणाद्वारे गर्भाशयाच्या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते, याबद्दल पालकांना माहिती देण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश्वरी सातव, मालगुंड आरोग्य केंद्रातील वैद्यकीय डॉ अमोल पनकुटे व डॉ सुनीता पवार यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक डॉ. परशुराम निवेंडकर यांनी सदर लसीकरणाबाबत मार्गदर्शन करून पालकांच्या शंकांचे निरसन केले. पालकांच्या संमतीनंतर विद्यालयातील पात्र मुलींचे HPV लसीकरण यशस्वीरित्या करण्यात आले.
लसीकरण मोहीम सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यालय व्यवस्थापन, व मुख्याध्यापक श्री. बिपीन परकर, शिक्षकवर्ग व आरोग्य विभाग यांनी उत्तम समन्वय साधला. समाजात कर्करोग प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि अधिकाधिक मुलींना संरक्षण मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री बिपीन परकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

