( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर आठवडा बाजारपेठेत भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असुन बाजारात येणाऱ्या ग्राहकांची पाकिटे मारणे या बरोबर अनेक लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मार्गाशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरवार असल्याने खरेदीसाठी संगमेश्वर आठवडा बाजारात गुरुवारी चांगलीच गर्दी ऊसळली होती. या गर्दीचा फायदा ऊठवत चोरट्याने चक्क एक नव्हे तर तब्ब्ल तीन मोबाईल फोन हातोहात लांबवले आहेत.
मोबाईल चोरी झालेल्या पैकी संत्या भोंगले (रा, वांद्री), प्रकाश वारोसे (रा, तेर्ये) यांचे बाजारात भाजी खरेदी करताना मोबाईल पळवले तर पांडुरंग तावडे (रा, कळंबस्ते मळदेवाडी) यांचा संगमेश्वर एस टी स्थानक आवारातुन मोबाईल लंपास करण्यात आला. सध्या तरी तीन फोन चोरल्याची माहिती मिळत असली तरी चोरट्याचे आणखी काही प्रताप पुढे एण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संगमेश्वर आठवडा बाजारात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक वर्गात चांगलीच दहशत पसरल्याचे पाहायला मिळत होती. या साऱ्या प्रकाराची दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी आठवडा बाजारात बंदोबस्त ठेवावा तसेच या चोरट्याच्या लवकरात लवकरच मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पुढे येत आहे.

