(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस आज अक्षरशः दयनीय अवस्थेत धावत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. गावा–गावांना जोडणाऱ्या अनेक एसटी बसेसच्या काचा तुटलेल्या, खिडक्या ढासळलेल्या, तर काही बसेस अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
सोमवारी दि. ११ जानेवारी रोजी देवरुख–आंबवली मार्गावर दुपारी २.३० वाजता सुटलेल्या एसटी बसची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. बसच्या खिडकीतील काचा कधीही कोसळतील, अशा स्थितीत होत्या. तरीही कोणतीही दखल न घेता ही बस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत होती. प्रवासादरम्यान कधी अपघात होईल, याची धास्ती प्रवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होती.
प्रवाशांच्या जीविताशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे एसटी प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “लोकांच्या सुरक्षेची प्रशासनाला काहीही पर्वा नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात खासगी वाहतुकीचे पर्याय मर्यादित असल्याने एसटीवरच अवलंबून राहावे लागते; मात्र अशा जीर्ण बसेसमधून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे चित्र आहे.
तरीही, सुस्थितीत असलेल्या आणि सुरक्षित बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, बसेसची तातडीने तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी ठाम मागणी नागरिक व प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

