(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील कोळंबे येथे ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याची तब्बल ३६ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वनविभागाने यशस्वी सुटका केली. विहिरीतील कपारीत दबा धरून बसलेल्या या नर बिबट्याने पिंजऱ्याकडे येण्यास नकार दिल्याने अखेर विहिरीत टँकरने पाणी सोडण्याची अभिनव युक्ती राबवण्यात आली आणि त्यातून ही मोहीम यशस्वी ठरली आहे.
गावातील दिनेश भागवत यांच्या आंबाबागेतील विहिरीत शनिवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास वासराचा पाठलाग करताना हा बिबट्या कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस पाटील समीक्षा तोरसकर यांनी तत्काळ वनविभागाला कळविले. त्यानंतर सकाळी नऊ वाजल्यापासून बचावकार्याला सुरुवात झाली. महाराष्ट्र वन विभाग च्या पथकाने दिवसभर विविध उपाय करूनही बिबट्याला पिंजऱ्यात आणण्यात यश आले नाही. विहिरीत सुमारे अडीच फूट पाणी असल्याने बिबट्या एका दगडी कपारीत सुरक्षित बसून राहिला होता. सलग प्रयत्न करूनही तो पिंजऱ्याकडे हलत नसल्याने बचावमोहीम अधिकच आव्हानात्मक ठरली.
अखेरीस वनाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून दोन मोठे टँकर मागवले. विहिरीत पाणी सोडण्यास सुरुवात होताच पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागली आणि कपारीत आश्रय घेतलेला बिबट्या बाहेर पडला. समोर रणनीतीपूर्वक लावलेल्या पिंजऱ्यात तो अडकताच ग्रामस्थांच्या मदतीने त्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत बिबट्याला कोणतीही दुखापत झाली नसून वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रत्नागिरी येथे आणण्यात आले आहे. साधारण तीन वर्षांचा हा नर बिबट्या असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून स्पष्ट झाले.
गेल्या दोन दिवसांपासून परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला या सुटकेनंतर पूर्णविराम मिळाला असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या मोहिमेत वनाधिकारी गिरीजा देसाई, प्रियांक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक वन अधिकारी प्रकाश सुतार तसेच नाना गावडे, विराज संसारे, दिव कोळेकर, विक्रम कुंभार, श्रावर्ण पवार, नमिता कांबळे आणि स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

