( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हील), रत्नागिरी येथील पोलीसचौकी अखेर ‘दृश्य’ झाली आहे. दीर्घकाळ अदृश्य अवस्थेत असलेल्या या चौकीबाहेर आता अधिकृत फलक लावण्यात आला असून, नागरिकांचा संभ्रम दूर होणार आहे.
दिनांक ६ मे रोजी “रत्नागिरी सिव्हीलमधील पोलीस चौकी ‘अदृश्य’!” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची प्रभारी पोलीस निरीक्षक शिवरकर यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानंतर संबंधित चौकीच्या ओळखीसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली असून, चौकीबाहेर स्पष्ट व मोठा फलक लावण्यात आला आहे. या चौकीचे स्थान सिव्हील रुग्णालयाच्या अपघात विभागाशेजारी असले तरी, कोणताही संकेतफलक नसल्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. पूर्वी ही चौकी मुख्य इमारतीजवळ व दिसेल अशा स्थितीत होती; मात्र रुग्णालयाच्या नूतनीकरणानंतर तिचे स्थलांतर अपेक्षित होते.
सध्या तरी चौकी मूळ ठिकाणी स्थलांतरित न होता, अडगळीत असलेल्या जागेतच नव्या फलकासह कार्यरत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधानाचा सूर उमटत असला तरी, “पूर्वीच्या ठिकाणी चौकी कधी स्थलांतरित होणार?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. तत्परतेने उपाययोजना करून नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलिस प्रशासनाचे या कृतीसाठी कौतुक होत आहे.

