( रत्नागिरी )
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी यांनी वैद्यकीय सेवेत एक महत्त्वपूर्ण यश संपादन करत, स्टोमा (शौचासाठी कृत्रिम मार्ग) बंद करण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या यशस्वी उपचारासाठी रुग्ण झिलू वेद्रे (वय ७०, रा. करबुडे) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उदय सामंत प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या संस्थेच्या मार्गदर्शनामुळे ही अत्यावश्यक आणि महागडी शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयात मोफतपणे उपलब्ध होऊ शकली.
प्राप्त माहितीनुसार, वेद्रे यांच्यावर सहा महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे पोटाच्या आजारावर उपचार करण्यात आले होते. त्या वेळी त्यांना स्टोमा करून शौचासाठी कृत्रिम मार्ग तयार करण्यात आला होता. त्यामुळे पोटावर पिशवी बांधून राहावे लागत होते. त्यानंतर ही स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली दुसरी शस्त्रक्रिया कोल्हापूर येथे होऊ शकली नाही, तर खासगी रुग्णालयांमध्ये त्यासाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर, श्री. वेद्रे यांनी उदय सामंत प्रतिष्ठानशी संपर्क साधला. संस्थेच्या सहाय्याने त्यांनी ९ मे २०२५ रोजी रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील डॉ. मनोहर कदम आणि डॉ. सुश्रुत तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील कुशल वैद्यकीय पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
या प्रक्रियेत, पोटावरील कृत्रिम मार्ग पूर्णतः बंद करून नैसर्गिक मार्गाने शौचाची क्रिया पूर्ववत करण्यात आली. डॉक्टरांनी Anastomosis तंत्राचा वापर करून आतड्यांचा नव्याने जोड तयार केला, जो अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने यशस्वी झाला असून सध्या सुरळीत कार्यरत आहे.
विशेषतः, ही संपूर्ण शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत करण्यात आली. रुग्णालयातील सेवा, सुविधा आणि उपचारांबद्दल समाधान व्यक्त करत श्री. वेद्रे यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, डॉ. मनोहर कदम, डॉ. सुश्रुत तेंडुलकर, भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले तसेच सर्व वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या यशस्वी उपचारामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय सेवांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. तसेच, सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात किंवा मोफत उपचार मिळावेत यासाठी शासन व सामाजिक संस्थांनी सुरू केलेल्या उपक्रमांना या यशामुळे बळकटी मिळाली आहे.