(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील नामांकित मत्स्य प्रक्रिया उद्योगाला आंतरराष्ट्रीय निर्यात व्यवहारात सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार २४० रुपयांचा (१,८२,००.१६० यूएस डॉलर्स) आर्थिक गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगलोर (कर्नाटक) येथील निर्यात कंपनीच्या संचालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजोळे एमआयडीसीतील जिलानी मरीन प्रॉडक्ट्स ही कंपनी मत्स्य उत्पादनांवर प्रक्रिया करून परदेशात निर्यात करते. या व्यवहारात मध्यस्थ म्हणून किशोर कुमार अँड कंपनी (एक्सपोर्ट्स) प्रा. लि. ही कंपनी काम पाहत होती. या कंपनीचे संचालक श्रीधरन किशोर कुमार यांनी ६ सप्टेंबर २०२५ ते १३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत इटलीतील Ardimar S.R.L. या कंपनीसाठी एकूण २४ टन मत्स्य उत्पादनांची मागणी नोंदवली होती. आरोपीने उत्पादनाचे पैसे वेळेत अदा करण्याचे आश्वासन देत जिलानी मरीन कंपनीचा विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून कंपनीने २४ टन माल इटलीला पाठवला. मात्र, संबंधित रकमेची भरपाई कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता आरोपीने दिशाभूल केल्याचा आरोप आहे. माल परदेशी पोहोचवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी कंपनीला मोठ्या रकमेचा गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी कंपनीचे लेखा व्यवस्थापक हैदरअली शब्बीर सनदी (वय ३५, रा. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी (१४ फेब्रुवारी २०२६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२) (विश्वासघात) आणि कलम ३१८ (३) (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारात रत्नागिरीतील उद्योगाला बसलेल्या या मोठ्या आर्थिक फटक्यामुळे व्यापारी व औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मंगलोर कनेक्शनचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे.

