(नाशिक)
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणी वाढत असून त्याच्याविरोधात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. आधीच लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. रविवारी हा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती असताना पूजा विधीच्या नावाखाली अशोक खरात याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच ही बाब उघड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.
संबधित पिडीता विवाहीत असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहित असताना संसारात वादविवाद होत असल्याने पीडित महिला गेली भोंदू खरातच्या कार्यालयात गेली होती. त्याठिकाणी या बाबाने तिचे पूजा विधीच्या नावाखाली लैगिंक शोषण केले. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करतांना पीडित महिला गर्भवती झाली. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करण्यासाठी खरातने कार्यालयात बोलावून तीला औषध दिले.
तिला सांगितले की, मी अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहे, मी भविष्य जाणतो असाही फिर्यादीत उल्लेख केला आहे. तसेच माझ्या नशिबात दोन विवाह आहे, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला व तुझे मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळ करेन असं आश्वासनही भोंदू खरातंने संबधित पिडीतेला दिले होते.
पतीला बाहेर बसवून अत्याचाराचा आरोप
पीडितेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, “आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने आम्हाला बोलावण्यात आले. मला बाहेर बसवून पत्नीला आत नेण्यात आले. काही वेळाने ती घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली. घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला,” असे तक्रारदाराने म्हटले आहे. या घटनेनंतर पीडिता काही काळ मानसिक धक्क्यात होती, असेही तक्रारीत नमूद आहे.
जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचे आरोप
तक्रारीत अशोक खरात लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी नकली साप, वाघाचे कातडे यांचा वापर करून अघोरी कृत्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
SIT चौकशीला वेग, क्राईम ब्रँचकडून तपास
नव्या गुन्ह्यामुळे या प्रकरणातील SIT चौकशीला वेग आला आहे. नाशिक पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेत त्याला क्राईम ब्रँच कार्यालयात आणले असून कसून चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक व्हिडिओ जप्त, आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता
दरम्यान, पोलिसांनी अशोक खरातकडून 58 पेक्षा जास्त व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलीकडेच एका व्हिडिओमध्ये तो अल्पवयीन मुलीवर अघोरी उपचार करताना दिसल्याने खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचा विस्तार वाढतोय
अशोक खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित न राहता मानसिक छळ, धमकावणे, जादूटोणा आणि अघोरी प्रकारांपर्यंत पोहोचले आहे. पोलिस आणि SIT यंत्रणा या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पोलीस कोठडीत त्याचा सुरुवातीचा तोरा उतरल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी अनेक मुद्द्यांना विचारलेल्या प्रश्नांवर कॅप्टन खरात केवळ मान हलवत होता. त्याचा थंड प्रतिसाद पाहून पोलिसांनी त्याला काठीचा प्रसाद दिल्याचे समजते. रविवारी तब्बल सात तास विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी झाल्याचे कळते. तपासादरम्यान जेव्हा पोलिसांनी खरातची कडक उलटतपासणी सुरू केली, तेव्हा तो सुरुवातीला संतापला होता. डोळे मोठे करून आणि थरथर कापत तो मोठ्या आवाजात “घोर अपराध… घोर अपराध…” असे ओरडू लागला आणि त्याने पोलिसांना “तुमच्यावर कोप होईल” असा शापही दिला.
पोलीस त्याला पुन्हा तुरुंगाकडे घेऊन जात असताना त्याने मान टाकली होती. माध्यमांच्या कॅमेरासमोर तोंड दिसणार नाही, अशा पद्धतीने तो काळजी घेत होता. माझ्यात आता शक्ती राहिली नाही, असे तो पोलिसांना सांगत होता. त्यावेळी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” अशा घोषणा त्याने दिल्या. अशाच घोषणा पुन्हा पुन्हा देण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यावर माझ्यात आता शक्तीच राहिली नाही, असे केविलवाणे तोंड करून खरात पोलिसांना विनवणी करीत असल्याचे दिसून आले.

