(संगमेश्वर /एजाज पटेल)
शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठ परिसरात भरदिवसा, भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या दोन साथीदारांसह हातात तलवार आणि लोखंडी रॉड नाचवत होंडा सिटी कारची अक्षरशः तोडफोड केली. एवढेच नव्हे तर, या प्रकाराला विरोध करणाऱ्या एका ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या समोर तलवार उगारून मध्ये पडाल तर बघून घेईन, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
संगमेश्वर पोलिसांच्या कडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, आज रविवारी सकाळी ९:३० च्या सुमारास कडवई बाजारपेठ येथील रहिवासी फरिदा कमाल वागले या आपल्या घरात असताना, आरोपी सुरेश दाजी इंजळे रा. ओकटेवाडी हा त्याच्या दोन अज्ञात साथीदारांसह तिथे धडकला. घरासमोर उभी असलेली आलिशान होंडा सिटी कार क्र. MH-02-AY-8602 कोणाची आहे, याची त्याने विचारणा केली. ही कार हर्षद मोडक यांची असल्याचे समजताच आरोपीने रागाच्या भरात कायद्याची सर्व मर्यादा ओलांडली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता सोबत आणलेली तलवार आणि लोखंडी रॉड बाहेर काढला आणि गाडीवर प्रहार करण्यास सुरुवात केली.
रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू असतानाही आरोपीने मोठ्या हिंस्त्रपणे गाडीच्या काचा फोडून वाहनाचे प्रचंड नुकसान केले. हा भयानक प्रकार पाहून फरिदा वागले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या डोळ्यांनी आरोपीने त्यांच्यावरच शस्त्र उगारले. या प्रकरणात मध्ये पडू नका, नाहीतर तुमचेही काही खरे नाही, अशा शब्दांत त्याने वृद्ध महिलेला धमकावले. या घटनेमुळे परिसरात एकच पळापळ झाली आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भरवस्तीत शस्त्रांचा असा उघड वापर झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
या गंभीर घटनेनंतर संगमेश्वर पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४), ३५१(२)(३), ३(५) आणि भारतीय हत्यार अधिनियम १९५९ कलम ४/२५ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार कडक कारवाईची तरतूद ठेवण्यात आली आहे. पोलीस हवालदार एस. एस. जाधव या गुन्ह्याचा तपास करत असून, घटनेनंतर पसार झालेल्या त्या दोन अनोळखी गुंडांचा पोलीस शोध घेत आहेत. आता पोलीस या गुंडांच्या मुसक्या कधी आवळतात आणि अशा प्रवृत्तींना कायमचा चाप बसवतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

