(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू असताना संगमेश्वर परिसरातील वाहतूक व्यवस्थेची मात्र मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दिवसा संगमेश्वर चौकात पोलीस कर्मचारी तैनात असल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरळीत राहते; परंतु रात्रीच्या वेळी पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वाहतूक कोंडीची समस्या आणखीनच तीव्र होते.
रात्री राष्ट्रीय महामार्गावरून खासगी बस, प्रवासी वाहने आणि जड मालवाहू ट्रक मोठ्या प्रमाणात धावतात. त्यात चौपदरीकरणासाठी सुरू असलेली खोदाई, अरुंद पर्यायी रस्ते आणि रस्त्यालगत ठेवलेले बांधकाम साहित्य यामुळे मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. परिणामी रात्रीच्या वेळी संगमेश्वर चौकात वाहनांची लांबच लांब रांग लागत असून प्रवाशांचा त्रास शिगेला पोहोचला होता.
कोंडी इतकी वाढते की, अनेकदा प्रवाशांनाच गाड्यांमधून उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. काही वेळा रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याच्या घटना समोर आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत होती. नागरिक आणि वाहनचालकांनी या बाबत वारंवार मागणी करूनही कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जात नव्हती.
अखेर ‘रत्नागिरी 24 न्यूज’ सोशल समाजमाध्यमावर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेत बुधवारी मध्यरात्रीपासून संगमेश्वर एसटी स्टँडलगत अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले. पोलिसांनी महामार्गावरील अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी सक्रिय काम करत संपूर्ण कोंडी दूर केली. दीर्घकाळानंतर प्रवासी आणि वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास टाकत ‘रत्नागिरी 24 न्यूज’ चे आभार व्यक्त केले.
वाहनधारकांचे म्हणणे आहे की, किमान महामार्गाचे काम सुरू असेपर्यंत रात्री संगमेश्वर चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. अन्यथा परिस्थिती कधीही हाताबाहेर जाऊ शकते. महामार्ग प्राधिकरण, पोलिस विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय साधून वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी, अशी नागरिकांची मागणी आता अधिक जोर धरीत आहे.

