याप्रसंगी ज्ञानेश्वरीचे अभ्यासक सुनील देशपांडे, अध्यात्मिक अभ्यासक डॉ. मिलिंद पटवर्धन, संत साहित्याचे अभ्यासक धनेश जुकर, भगवद्गीता प्रचारक केतन केळकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे तसेच ज्येष्ठ पत्रकार, पाटणकर यांचे स्नेही शिरीष दामले मंचावर उपस्थित होते. त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि संत ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन पुणे येथील उद्योजक व कार्यक्रमाचे आयोजक अशोक अत्रे यांनी केला.
नारायण पाटणकर यांचे अध्यात्मविषयक हे पंधरावे पुस्तक आहे. याविषयी ते म्हणाले, आपण अज्ञानी आहोत हे बऱ्याचदा कळत नाही. अमृतानुभव हे संत ज्ञानेश्वरांचे आहे. जसं भावलं तसं दिलं आहे. सद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रथित केलेल्या अमृतानुभवाची ही एक प्रकारे सध्या प्रचलित असलेल्या मराठीतील फेरमांडणी आहे. हे सर्व लिखाण साक्षात्कारातून केले.
पुण्याच्या स्नेहल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याबाबत प्रकाशक रवींद्र घाटपांडे यांनी सांगितले की, पाटणकर यांची ९ पुस्तके प्रकाशित केली आहेत. यापुढेही त्यांनी असेच लिखाण करत राहावे, प्रकाशन करू. याप्रसंगी नारायण पाटणकर आणि सौ. नीता पाटणकर यांचा विशेष सन्मान श्री. अत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार शिरीष दामले यांनी पाटणकर दांपत्याचे कौतुक करून गेली ४० वर्षे त्यांच्या मैत्रीबद्दल आणि मायेची चादर पांघरल्याचे सांगितले.
अध्यात्माकडे वळले पाहिजे – केतन केळकर
श्री. केळकर म्हणाले की, संभाजीनगर येथून आम्ही ६ जण आलो आहोत. मी वयाच्या ५० व्या वर्षापासून तरुणांना भगवद्गीता शिकवत आहे. करिअर व फिटनेसवर जसा तरुण पिढी भर देते, त्याप्रमाणे अध्यात्माकडेही वळले पाहिजे. ते पाटणकर पद्यातही विचार करतात. ते निर्मळ आहेत, त्यांच्यासोबत संवादात राहून आम्हीसुद्धा निर्मळ होत आहोत. आमचेही साधकत्व समर्थ व्हावे.
अनुभवाशिवाय लेखन नाही – जुकर
मुंबईतील धनेश जुकर म्हणाले की, पाटणकर यांचे संत कबीरावरील पुस्तक वाचून मी संपर्क साधला. पहिली भेटच सहा तास चालली. ते जशी शब्दांची साधी फोड करतात, त्यातून गंमत वाटली आणि आमचा संवाद वाढला. ते अनुभवाशिवाय लिहीत नाहीत. त्यांचे वाचन करताना आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, तरच आपण अध्यात्म समजून घेऊ शकतो.
जे. कृष्णमूर्तींप्रमाणे प्रभावित झालो – वाघमारे
नाशिक येथील अरुण वाघमारे यांनी सांगितले की, जे. कृष्णमूर्ती यांच्याप्रमाणेच पाटणकर यांचे विचार प्रभावित करून गेले. त्यांचे पुस्तक वाचून मी फोन केला. पहाटे त्यांना जे दिसतं, साक्षात्कार होतो, त्यावर ते सकाळी सकाळी लिहितात आणि मला अनेकदा फोन करतात. अनेक पद्य मी ध्वनिमुद्रित केली असून ती आता यू ट्यूबवरदेखील उपलब्ध करून दिली आहेत.
अमृतानुभव म्हणजे आनंदाचा ठेवा – डॉ. सुनील देशपांडे
वाई येथून आलेले डॉ. सुनील देशपांडे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. अमृतानुभव घेण्यासाठी जरूर सर्वांना हे पुस्तक आवर्जून वाचावे, मी तर याची पारायणेच करणार आहेत. त्याशिवाय अर्थ समजणार नाही.
सूत्रसंचालक निबंध कानिटकर यांनी श्रोत्यांची वाहवा मिळाली. कार्यक्रमाचे सूत्र पकडून त्यांनी समर्पक मल्लिनाथी केली. सीमा हर्डीकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सौ. कांचन चांदोरकर यांनी योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

