( लांजा )
नगरपंचायतीच्या निवडणुकीत लांजा भाजपा शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युती अमान्य करून स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत असून पक्ष स्तरावरून युतीचा निर्णय कायम राहिल्यास शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी हे सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र लांजा शहर भाजपाच्या शनिवारी पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत युतीचा निर्णय अमान्य करत सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लांजा नगरपंचायतीची निवडणूक ही स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा शहर कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाशी युती अमान्य करून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
शहरातील भाजपा कार्यालयामध्ये याबाबतची बैठक शनिवारी दुपारी पार पडली. त्यामध्ये भाजपा शहर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाशी युती न करता ही नगरपंचायतीची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील ग्रामपंचायत, नगरपंचायतच्या निवडणुका युती न करता स्वबळावरच लढवल्या होत्या. त्यामुळे सद्धया होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शतप्रतिशत भाजपा या घोषणेला अनुसरून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ही नगरपंचायतीची निवडणूक स्वतंत्रपणे आणि स्वबळावर लढण्याच्या ठाम निर्णय घेतला आहे. शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या या बैठकीतील निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना देखील कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले. भाजपा शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असताना भविष्यात पक्षस्तरावरुन युतीची भूमिका कायम ठेवल्यास लांजा शहरातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते हे सामुदायिक राजीनामा देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शहर कार्यालयात झालेल्या बैठकीला शहराध्यक्ष मयुर शेडे, जिल्हा निमंत्रित सदस्य विजय कुरूप, जिल्हा पदाधिकारी प्रमोद कुरूप, माजी नगरसेवक व गटनेता संजय यादव, सुमंत वाघदरे, शेखर सावंत, इक्बाल गिरकर, विशु जेधे, हरीश जेधे, अनिल कांबळे, ओमकार आंब्रे, रवींद्र राणे आदींसह शहरातील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

