(संगमेश्वर / एजाज पटेल)
पवित्र रमजान महिन्यातील ३० दिवसांच्या रोजांनंतर साजरा होणारा ईद-उल-फितर हा सण आज शनिवारी (२१ मार्च) संगमेश्वरमध्ये अत्यंत भक्तीभाव आणि उत्साहात पार पडला. मापारी मोहल्ल्यातील जामा मस्जिदमध्ये सकाळपासूनच श्रद्धेचा माहोल निर्माण झाला होता.
यावर्षीच्या रमजानमधील विशेष आकर्षण ठरले ते महिनाभर चाललेले तरावीह नमाज आणि कुराण पठण. हाफिज रझा यांनी मधुर आवाजात आणि पूर्ण श्रद्धेने ३० दिवसांत संपूर्ण कुराण शरीफचे पठण पूर्ण केले. त्यांच्या या कार्याबद्दल मापारी मोहल्ला जमातचे अध्यक्ष रऊफ खान आणि सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली.
आज सकाळी साडे आठ वाजता जामा मस्जिदचे इमाम हजरत मौलाना मनजूर आलम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने ईदची नमाज अदा केली. नमाजनंतर त्यांनी खुतबा सादर करत ईदचा खरा संदेश स्पष्ट केला—अहंकार त्याग, गरजूंना फितरा देणे आणि मानवतेची सेवा हीच ईदची खरी शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले.
नमाजानंतर सर्व भाविकांनी सामूहिक दुआ करत देशात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक सलोखा नांदावा, अशी प्रार्थना केली. त्यानंतर एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाने वातावरण भारावून गेले.
संगमेश्वरची खास परंपरा जपत यंदाही हिंदू-मुस्लिम एकोप्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. मशिदीबाहेर उपस्थित हिंदू बांधवांनी आपल्या मुस्लिम मित्रांना आणि शेजाऱ्यांना शुभेच्छा देत सामाजिक ऐक्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित केला.
यावेळी संगमेश्वर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्थानिक मुस्लिम तरुणांनी ड्युटीवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.
अशा प्रकारे अध्यात्म, कुराण पठण, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधत संगमेश्वर मापारी मोहल्ल्यात ईद-उल-फितरचा सण अत्यंत आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

