(चिपळूण)
तालुक्यातील टेरव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील तक्रारग्रस्त उपशिक्षिकेच्या बदलीबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने २० मार्चपासून जाहीर करण्यात आलेले शाळा बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापती व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत आणि पालकांना संबंधित शिक्षिकेची बदली करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
टेरव येथील या शाळेत सध्या १३५ विद्यार्थ्यांची पटसंख्या असून, डिसेंबर २०२३ पासून कार्यरत असलेल्या एका उपशिक्षिकेबाबत पालकांकडून सातत्याने तक्रारी नोंदविण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला; मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत होती. ग्रामस्थांच्या मते, संबंधित शिक्षिकेच्या भूमिकेला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याची भावना निर्माण झाल्याने प्रश्न अधिक चिघळला. या पार्श्वभूमीवर १८ मार्च रोजी झालेल्या टेरव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित उपशिक्षिकेची तातडीने बदली करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा ठराव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
सध्या संबंधित महिला शिक्षिका वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शाळा बंद राहिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला फटका बसू शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तक्रार असलेल्या शिक्षिकेची इतरत्र बदली करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविल्याचे पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले आणि गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळेत अतिरिक्त शिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. पंचायत समितीकडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याचे पाहून शाळा बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच किशोर कदम यांनी दिली. या घडामोडींमुळे टेरवमधील शैक्षणिक वातावरणात निर्माण झालेला तणाव काहीसा निवळला असून, आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

