( अलिबाग )
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. पुण्याहून फिरण्यासाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणीला समुद्रात बुडताना पोलिसांनी प्रसंगावधान राखत रोबोटिक बोयोच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक ‘रोबोटिक बोयो’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
समुद्राच्या खोल पाण्यात ओढली गेली तरुणी
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे पुण्याहून अलिबाग तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. शुक्रवारी (22 मे) सकाळी सुमारे 7.40 वाजण्याच्या सुमारास दोघे समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सिद्धी साबळे (वय 20) अचानक खोल पाण्याकडे ओढली जाऊ लागली. क्षणात परिस्थिती गंभीर बनली आणि ती बुडू लागली. समुद्राच्या लाटांमध्ये ती मदतीसाठी झुंज देत असतानाच किनाऱ्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.
पोलिसांची तत्परता आणि रोबोटिक बोयोचा उपयोग
कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रवीण रोटकर आणि जितेंद्र माने यांनी कोणताही विलंब न करता रोबोटिक बोयो (Remote Operated Watercraft) समुद्रात सोडला. या अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने त्यांनी वेगाने तरुणीपर्यंत पोहोचत तिचा जीव वाचवला. या जलद कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून, उपस्थित पर्यटकांनी पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले.
‘रोबोटिक बोयो’ ठरतोय खरा जीवनरक्षक
दरम्यान, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी शुक्रवारी नागाव बीच येथे रोबोटिक बोयोचे प्रात्यक्षिक पाहिले. यावेळी त्यांनी या यंत्राच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली आणि “रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. समुद्रकिनाऱ्यांवर वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर अशा अत्याधुनिक सुरक्षा साधनांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

