(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर पाली परिसरात भीषण अपघात घडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खानूगाव हद्दीत झालेल्या या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष किशन धाडवे (वय ३२, रा. कडूगाव मठ, ता. लांजा) हे दुचाकी (एमएच ०८ डीएल ७९९६) घेऊन मठहून खानूकडे येत होते. दरम्यान, पेट्रोल भरण्यासाठी रस्ता ओलांडत असताना पालीहून लांजाकडे जाणाऱ्या व्हॅगनार कारने (एमएच ०५ ईव्ही ६४३५) त्यांना जोरदार धडक दिली.
अपघातात जागीच मृत्यू
सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात आशिष धाडवे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर महामार्गाच्या एका बाजूला मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र आणि पाली पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
गुढीपाडव्याच्या दिवशीच कुटुंबावर आघात
मृत आशिष धाडवे यांचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. ते नोकरीच्या शोधात काही महिन्यांपूर्वी गावी परतले होते आणि नुकतीच त्यांना पाली येथे नोकरी मिळाली होती. संसार सुरळीत सुरू होत असतानाच गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
या अपघाताची माहिती संतोष लक्ष्मण धाडवे यांनी दिल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रोशन सुर्वे करत आहेत.

