( मुंबई )
शिवसेनेच्या 19 जून रोजी वर्धापन दिनाच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि परभणीचे खासदार संजय जाधव हे चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले आहेत. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली होती. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी सुरुवातीला संपर्क होत नसल्याची चर्चा होती. मात्र तेही हैदराबादमार्गे दिल्लीकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. या पाच खासदारांची नावे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेत सातत्याने घेतली जात आहेत. दरम्यान, मुंबईतील खासदार संजय दिना पाटील हे देखील दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने शिंदे गटाला पाठिंबा देणारे संभाव्य सहावे खासदार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत या खासदारांची भेट घेणार असून त्यानंतर सहा खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे सादर केले जाऊ शकते. ठाकरे गटाच्या एकूण नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यास संसदीय गटाच्या समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दिल्लीत दाखल झाले असून संभाव्य राजकीय आणि कायदेशीर पर्यायांवर सल्लामसलत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी सुरू झालेल्या या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उत्सुकता वाढली असून, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या सहाव्या खासदाराचे नाव नेमके कोणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी लोकसभेतील एखाद्या पक्षाच्या किमान दोन तृतीयांश खासदारांनी स्वतंत्र गट तयार करणे आवश्यक असते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभेत 9 खासदार आहेत. त्यामुळे अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी किमान 6 खासदारांनी एकत्र येऊन स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल. मात्र, केवळ स्वतंत्र गट स्थापन करणे पुरेसे नसून त्या गटाला एनडीएतील एखाद्या घटक पक्षात विलीन व्हावे लागेल. अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी लागू होण्याची शक्यता राहते.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून तो ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या नव्या पक्षात विलीन केला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची रणनीती आखली जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
संजय राऊत यांनी काल X या समाज माध्यमावर पोस्ट करताना, अपना सपना मनी…मनी. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा अॅडवान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाकडूनही हालचाली सुरू
दुसरीकडे, ठाकरे गटानेही संभाव्य राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर आणि संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या सर्व चर्चांवर संबंधित खासदारांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

