(देवळे / प्रकाश चाळके)
तहसीलदार कार्यालयाचा पुरवठा विभाग, संगमेश्वर (देवरुख) आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संगमेश्वर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल व काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. किरण देशपांडे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व आणि या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. महेंद्र कांबळे यांनी “डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण” या विषयावर मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुलभ झाली असल्याचे त्यांनी उदाहरणांसह सांगितले. नागरिकांना घरबसल्या, मोबाईलच्या माध्यमातून अनेक शासकीय सेवा घेता येत असल्याने वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वप्रथम संगमेश्वर तहसीलदार कार्यालयामार्फत ई-रेशनकार्डचे वितरण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सहसचिव नेहा जोशी यांनी पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थी आणि जागृती ग्राहक गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले. ग्राहक कायद्याने दिलेले हक्क, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांची माहिती देत त्यांनी ग्राहकांची विविध मार्गांनी होणारी फसवणूक, त्यावरील उपाययोजना, तसेच अन्नपदार्थातील भेसळ व फसवणुकीबाबत सतर्कतेचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रा. प्रवीण जोशी यांनी केले. यावेळी अक्षय सतरकर (पुरवठा निरीक्षक, तहसीलदार कार्यालय, संगमेश्वर), जागृती ग्राहक गटाचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक व सेवक वर्गाचे सहकार्य लाभले.

