(देवळे / प्रकाश चाळके)
मावशी हळबे यांनी स्थापन केलेल्या देवरुख मातृमंदिर गोकुळ बालीकाश्रमात सध्या १७ मुली शिक्षणाबरोबरच आत्मभान आणि स्वावलंबनाचे धडे गिरवत आहेत. या मुलींसाठी समाजातील अनेक दातृत्ववान व्यक्ती वेळोवेळी मदतीचा हात पुढे करतात. अलीकडेच अशा मदतीचा हात सामाजिक भान जपणारे आणि सढळ हस्ते मदत करणारे यासिन खतीब यांनी पुढे केला आहे.
खतीब यांनी बालीकाश्रमातील मुलींसाठी लागणारा एक महिन्याचा किराणा माल स्वतः गोकुळ आश्रमाच्या अधिक्षिकांकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे, त्यांनी याआधीही या संस्थेला मदत केली असून, संस्थेच्या कार्याला आपले पाठबळ कायम ठेवले आहे.
मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी खतीब यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “समाजातील अशा दातृत्ववान व्यक्तींमुळे या मुलींच्या शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या प्रवासाला बळ मिळते. खतीब यांच्यासारख्या व्यक्ती समाजासाठी प्रेरणादायी आहेत.”
यावेळी यासिन खतीब म्हणाले, “आपल्याला मिळालेल्या सुख-संपत्तीतील काही वाटा समाजासाठी द्यावा ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपण हे जपतो, तेव्हा समाज अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील बनतो,” असे त्यांनी सांगितले.

