(नाशिक)
नाशिकमध्ये स्वयंघोषित ‘कॅप्टन’ आणि भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या कृत्यांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. महिलांना धार्मिक व तांत्रिक विधींचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात सुरुवातीला ५८ व्हिडिओ समोर आले होते, मात्र विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत ही संख्या १०० च्या पुढे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत विशेष तपास पथक स्थापन केले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून त्यांनी नाशिकमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सखोल आढावा घेतला आहे.
घरझडतीत मोठा साठा जप्त
खरातच्या घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे लागले. यात दोन लॅपटॉप, ८ लाखांची रोख रक्कम
पिस्तुल आणि जिवंत काडतुसे, विविध मालमत्तेची कागदपत्रे
यांचा समावेश आहे.
व्हिडिओंचा धक्कादायक वापर
या प्रकरणात नीरज जाधव या संशयिताने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. खरातच्या कार्यालयातून व्हिडिओ चोरल्यानंतर त्याने सुरुवातीला खरातलाच ब्लॅकमेल करत तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे. पैसे न मिळाल्यानंतर त्याने थेट पीडित महिलांनाच धमकावण्यास सुरुवात केली.
शिर्डीतील एका २४ वर्षीय विवाहित महिलेला मॉर्फ फोटो व व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आले. इतकेच नव्हे, तर मंदिरातच तिला गाठून दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रकरणाला वळण देणारा टर्निंग पॉइंट
सिडको परिसरातील एका महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवण्यात आला. यानंतर कुटुंबाच्या पाठिंब्याने संबंधित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आणि संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला.
अटक आणि पुढील तपास
३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. नीरज जाधव यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तपासात अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.
महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना विविध प्रलोभने दाखवत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत असून, तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे.

