(रत्नागिरी)
शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे तसेच माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन दिनांक १४ मार्च २०२६ रोजी उत्साहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व उद्घाटनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्री. निलेश मिरजकर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमात दिवंगत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मार्गदर्शन सत्रात आयसीएआर-सीआयएफटी येथील यंग प्रोफेशनल श्री. शुभम महाडिक, कोळंबी शेतकरी श्री. जतिन केनी तसेच जागतिक कृषी आणि अन्न संघटने च्या कार्यक्रम समन्वयक डॉ. श्रुतिका सावंत यांनी विद्यार्थ्यांना करिअरविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मत्स्य व्यवसायातील स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावरील संधी, उद्योजकता आणि रोजगाराच्या विविध मार्गांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मत्स्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये रोजगार, स्वयं-रोजगार आणि उद्योजकतेच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, शासकीय स्तरावून सुद्धा मत्स्य व्यवसायाला चालना देण्याकरिता विविध योजना सुरु करण्यात येते आहेत. त्याचा फायदा पदविकाधारक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. आभार प्रदर्शन श्री. रोहित बुरटे यांनी केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यशाळेतून करिअरविषयी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.

