(गणपतीपुळे / वैभव पवार)
जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा-इस्रो परीक्षा २०२५-२६ मध्ये दैदिप्यमान यश संपादन करत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून नासा आणि इस्रो या दोन्ही संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी पात्र ठरलेली मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाची विद्यार्थिनी कु. आर्या मोहन शिगवण आता अमेरिकेतील नासा (NASA) अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिचा हा बहुप्रतीक्षित दौरा १२ नोव्हेंबरपासून सुरू होत असून १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत तिला अमेरिकेतील नामांकित अंतराळ संशोधन संस्थेत अभ्यासाची संधी मिळणार आहे. यापूर्वी मे महिन्यात तिने इस्रोचा (बेंगळुरू) अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील शिगवणवाडीमधील एका सर्वसामान्य कुटुंबातील आर्याने अवघ्या इयत्ता आठवीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे यश मिळवले आहे. बालपणापासूनच अभ्यासातील कुशाग्र बुद्धिमत्ता आणि विविध क्षेत्रांतील गुणवत्तेच्या जोरावर तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने गुणवत्ता यादीत विशेष क्रमांक पटकावला होता.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आर्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. कबड्डी आणि खो-खो यांसारख्या मैदानी खेळांमध्येही तिने विशेष प्रावीण्य मिळवले आहे. अभ्यास, क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत तिने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आहे.
मे महिन्यात इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झाल्यानंतर वरची निवेंडी गावातील ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला होता. तसेच निवेंडी ग्रामपंचायतीच्या वतीने तिचा विशेष नागरी सत्कारही करण्यात आला होता. आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी ठरल्याने वरची निवेंडी, मालगुंड आणि गणपतीपुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशामागे आई-वडिलांचे भक्कम पाठबळ, बळीराम परकर विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे आर्याने कृतज्ञतापूर्वक नमूद केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर इस्रो आणि नासासारख्या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी पात्र ठरण्याची कामगिरी केली आहे. तिची ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील झेप संपूर्ण कोकणासाठी अभिमानास्पद असून जिल्ह्यातील अन्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.


