(रत्नागिरी / वार्ताहर)
मंगळुरूहून गुजरातच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेसमधून पडून एका ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी येथे घडली. दिपक विजय गोहिल (वय ३१, रा. विठ्ठल सना, शिहोर, ता. पादरा, जि. बडोदरा, गुजरात) असे मृत तरुणाचे नाव आहे. चालत्या रेल्वेतून तोल जाऊन थेट रुळावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपक गोहिल हा आपल्या एका सहकाऱ्यासोबत रविवारी, १ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोरबंदर एक्सप्रेसने मूळ गावी जाण्यासाठी निघाला होता. प्रवास सुरू असताना सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक त्याचा तोल गेला आणि तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी ११.५० वाजता दिपक याला मृत घोषित केले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.


