(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील शीर भाटले येथील आंबेकरवाडी परिसरात आज (बुधवारी) सकाळी कुडली-चिपळूण एसटी बसला अपघात झाला. धावत्या बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अपघातग्रस्त झाली. या घटनेत चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
कुडली येथे मुक्कामी असलेली ही एसटी बस बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन चिपळूणच्या दिशेने रवाना झाली होती. सकाळची फेरी असल्याने बसमध्ये व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी तसेच अन्य प्रवासी प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना बस शीर भाटले येथील आंबेकरवाडी परिसरात पोहोचली. त्याचवेळी अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला.
धावत्या बसमध्ये अचानक घडलेल्या या तांत्रिक बिघाडामुळे काही क्षणांतच बस अनियंत्रित झाली. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या अपघातात बसमधील चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची तीव्रता अधिक नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, एसटी बसच्या तांत्रिक स्थितीचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धावत्या बसचा स्टेअरिंग रॉड तुटण्यासारखा प्रकार घडल्याने एसटी प्रवासातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.


