(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील जी.जी.पी.एस. शाळा येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘नाईट कॅम्प’मधून मुलांनी शिक्षणाचा एक वेगळाच अनुभव घेतला. शालेय शिक्षणाला अनुभवाधारित परिमाण देत या उपक्रमात भाषाशिक्षण, विज्ञान, खगोल निरीक्षण, सर्जनशीलता आणि योग यांचा सुरेख संगम साधण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाची सुरुवात मैदानावरील खेळांपासून झाली. खेळांनंतर प्रार्थना आणि श्लोकांद्वारे वातावरणात एकाग्रता आणि शिस्त निर्माण करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना जागतिक भाषांचे महत्त्व समजावून सांगत जर्मन भाषेची प्राथमिक ओळख करून देण्यात आली. सौ. अश्विनी तांबे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शब्द, उच्चार आणि सोपे संवाद शिकविले. या सत्रात मुलांचा सहभाग विशेष उत्साहपूर्ण होता.
यानंतर प्रा. सुतार यांनी अंतराळवीर सुधांशू शुक्ला यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रेरणादायी सत्र घेतले. संघर्ष, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर मोठी स्वप्ने कशी साकार होऊ शकतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना या संवादातून झाली. रात्रीच्या शांत वातावरणात आकाश निरीक्षणाचा उपक्रम हा कॅम्पचा विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांना विविध ग्रह, तारे आणि नक्षत्रांची माहिती देण्यात आली. दुर्बिणीतून ग्रहांचे निरीक्षण करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले कुतूहल आणि आनंद लक्षणीय होता. विश्वाबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाल्याने मुलांच्या विज्ञानाभिमुख विचारांना चालना मिळाली.
शेकोटीभोवती रंगलेल्या सायंकालीन सत्रात विद्यार्थ्यांनी गाणी, सादरीकरणे आणि विविध कलागुण सादर करून वातावरण रंगतदार केले. या संस्मरणीय अनुभवाची नोंद म्हणून कला शिक्षिका अपर्णा जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक रंगीत फलकही तयार केला. पहाटे समुद्रकिनाऱ्यावरील आल्हाददायक वातावरणात योगसत्राचे आयोजन करण्यात आले. योग शिक्षिका श्रद्धा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासने आणि प्राणायाम करत दिवसाची सुरुवात केली. ‘बीच योगा’मुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक प्रसन्नतेचाही अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे आयाम मिळतात आणि जगाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित होतो,” असे मत मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर यांनी व्यक्त केले. या उपक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून पालकांकडूनही त्याचे कौतुक करण्यात आले. शाळेच्या उपक्रमाचे संस्थेच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीश शेवडे आणि शाळा समिती अध्यक्ष सुहासभाऊ पटवर्धन यांनी विशेष अभिनंदन केले.

