(मुंबई)
यंदाच्या उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना विश्रांतीऐवजी सरकारी कामाचा ताण सहन करावा लागणार आहे. राज्यात होणाऱ्या डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना प्रशिक्षणासाठी आणि प्रत्यक्ष कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मे-जून महिन्यातील सुट्ट्यांवर मोठा परिणाम होणार आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशानुसार, जनगणनेसाठी नियुक्त शिक्षकांना 16 मे ते 15 जून या कालावधीत जिल्ह्याच्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या काळात त्यांना डिजिटल जनगणनेचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामही करावे लागणार आहे.
दरम्यान, चालू शैक्षणिक वर्ष 30 एप्रिल रोजी संपणार असून शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 26 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, या सुट्टीच्या काळात शिक्षकांना जनगणनेच्या कामामुळे विश्रांती मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन वर्षांत लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना यंदा काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु आता पुन्हा जनगणनेच्या कामामुळे त्यांना अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
शिक्षकांना 1 मेनंतर शाळांना सुट्टी असली तरी मुख्यालय सोडता येणार नाही. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 16 मेपासून 15 जूनपर्यंत त्यांना जनगणनेच्या ऑनलाइन कामात गुंतवून ठेवले जाणार आहे. यामुळे उन्हाळ्यातील पर्यटन, देवदर्शन, कौटुंबिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभांवर परिणाम होणार असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरीही, राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेसाठी प्रशासनाने शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नेमणूक केली असून, त्यांना दिलेल्या आदेशांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

