(गणपतीपुळे / वैभव पवार)
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा आणि हिंदू मराठी नववर्षाच्या शुभ दिनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात श्रींच्या समोर नयनरम्य व अतिशय मनमोहक अशी आम्रफळांची आरास साकारण्यात आली आहे. तसेच समोरील प्रांगणात नववर्षाभिनंदन अशा पद्धतीची आकर्षक रांगोळी साकारण्यात आल्याने भाविक व पर्यटकांसाठी आम्रफळ आरास व रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली.
मालगुंड गणपतीपुळे पंचक्रोशीतील ज्येष्ठ आंबा व्यावसायिक अनंत सुधाकर मोरे आणि समस्त मोरे परिवारामार्फत जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री लंबोदराच्या मुख्य गाभाऱ्यात मंदिराचे मुख्य पुजारी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर यांच्या द्वारे “श्रीं” च्या चरणी आम्रफळांची नयनरम्य आणि मनमोहक आरस साकारण्यात आली आहे. आजच्या शुभ दिनी गणपती मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. यावेळी स्थानिकांंबरोबरच अनेक भाविक व पर्यटकांनी श्रींचे दर्शन घेऊन एकमेकांना गुढीपाडवा व हिंदू मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपला आनंद अधिक द्विगुणित केला.
याप्रसंगी गणपती मंदिरात मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी भाविकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना आणि आपल्या सहकुटुंब सहपरिवारास नूतन मराठी वर्ष उत्तम आयुरारोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, सुख समाधान प्राप्तीचे जावो, आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा हेतू मनोकामना परिपूर्ण होवोत अशी प्रार्थना स्वयंभू श्री लंबोदराच्या चरणी केली.

