(मुंबई)
राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेच्या पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामध्ये राज्यभरातील 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज वाटप करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये केवळ 4 लाख 55 हजार 364 विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश अद्यापपर्यंत निश्चित केला आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली. शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे की, उर्वरित विद्यार्थ्यांना आज ( 7 जुलै, सोमवार) सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
आतापर्यंत निश्चित झालेल्या प्रवेशांमध्ये 3 लाख 80 हजार 502 विद्यार्थी हे CAP (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) अंतर्गत प्रवेशित झाले असून, 74 हजार 862 विद्यार्थी हे संस्थानिहाय आणि अल्पसंख्यांक कोट्यांतर्गत आहेत. पुणे विभागात एकूण 1 लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर झाले असून, इतर प्रमुख शहरी भागांतही प्रवेशांची प्रक्रिया सुरु आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा राज्यभरातून तब्बल 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता. यामध्ये कला शाखेसाठी 2 लाख 31 हजार 356, वाणिज्य शाखेसाठी 2 लाख 24 हजार 931, तर विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या अर्जांवर प्रक्रिया करून, पहिल्या फेरीसाठी 6.32 लाख विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे.
राज्यातील अकरावी प्रवेशासाठी एकूण 9 हजार 435 महाविद्यालये असून, यात 16 लाख 70 हजार 598 जागा CAP अंतर्गत, तर 4 लाख 53 हजार 122 जागा कोटा प्रवेशासाठी आरक्षित आहेत. एकूण 21 लाख 23 हजार 720 जागा या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध आहेत. आतापर्यंत 13 लाख 45 हजार 974 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 4.55 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
सद्यस्थितीत CAP अंतर्गत 13 लाख 36 हजार 198 जागा आणि कोटा अंतर्गत 3 लाख 79 हजार 261 जागा अजूनही उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण 17 लाख 15 हजार 459 जागा दुसऱ्या आणि पुढील फेऱ्यांसाठी खुल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाकडून पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी निर्धारित वेळेत आपला प्रवेश निश्चित करून पुढील फेरीत स्थान जाण्यापासून वंचित राहू नये. प्रवेश निश्चिती न झाल्यास पुढच्या फेरीत पुन्हा नवीन पसंतीक्रमासह अर्ज करावा लागेल, त्यामुळे वेळेत निर्णय घेणं आवश्यक आहे.