(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणाचे बांधकाम १९७९ साली सुरू झाले. याआधीच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले होते. जयगड प्रादेशिक नळपाणी योजना प्रत्यक्षात १९८६ पासून सुरू झाली, त्यावेळी धरणातील पाणीसाठा फक्त ०.३४६ एम.सी.यु.एम. एवढाच होता. धरणाची लांबी १६५ मीटर व उंची ६५ मीटर असून उन्हाळ्यात ८–९ फूट प्लाकिंग करून साठा वाढवावा लागत असे. गळतीमुळे नदीत वाहून जाणारे पाणी ३० एचपी पंपाद्वारे परत धरणात टाकावे लागे.
सुरुवातीला या योजनेत फक्त ७–८ गावांचा समावेश होता. त्या वेळी ७५ एचपी पंप २०–२२ तास सुरू ठेवावे लागत. कालांतराने पाणीपुरवठा व्यवस्था वाढत गेली, मात्र जुन्या पंप व पाईपलाईनमुळे बिघाड वाढले. २७ गावांना पाणी पुरवणे ही मोठी कसरत तत्कालीन जिल्हा परिषद उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) वृषभ उपाध्ये, जयगड प्रादेशिक नळपाणी योजना मुकादम आनंदा मुळ्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांना करावी लागत असे. सध्या या धरणातून दररोज २५–३० लाख लिटर पाणीपुरवठा होतो.
धरण परिसरात सुमारे दोन एकर क्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने आंबा, नारळ, सुपारी, काजू, केळी, फणस, विविध फुलझाडे व देखणी बाग तयार केली आहे. या परिसरात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज यांची इमारती रम्य निसर्गाच्या सान्निध्यात आहेत. पर्यटक, कंपनी अधिकारी, कर्मचारी व शिक्षक भेट देऊन समाधान व्यक्त करतात.
सन २०२२–२३ आणि २०२३–२४ या दोन वर्षांत धरणाची उंची वाढवणे, जॅकेटिंग आणि ग्राऊटिंगचे काम उत्तम प्रकारे झाले. त्यामुळे पाणीसाठा दुप्पट झाला असून सध्याचा साठा ०.६९८ एम.सी.यु.एम. इतका आहे. यामुळे आता प्लाकिंगची गरज नाही. या यशस्वी कामामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट आहे.
मात्र नवीन जॅकवेल आणि पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याची लाभार्थींची आग्रही मागणी आहे. तसेच गणपतीपुळे–वरवडे–मालगुंडजवळ असलेल्या या निसर्गमय धरणाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थ, प्रवासी व पर्यटकांनी केली आहे. कळझोंडी गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पर्यटनविकासाकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास हा परिसर कोकणातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनू शकतो.

