( रत्नागिरी /प्रतिनिधी )
राज्यात गुटख्यावर बंदी असताना देखील महत्वाच्या एक्सप्रेस रेल्वेत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याची गंभीर प्रकार उघडकीस आली आहे. प्रवाशांच्या नजरेस ही विक्री वारंवार पडत असून देखील रेल्वे पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुटखा विक्रेते थेट पाठीवर बॅग घेऊन रेल्वेच्या डब्यांमध्ये फिरत असल्याचे पाहायला मिळतात. या बॅगांमध्ये गुटख्याची भरपूर पॅकेट्स लपवून ठेवली जात असून, रेल्वेतील प्रवाशांना गुटखा चढ्या दराने विकला जातो. या प्रकाराला आळा घालण्याऐवजी प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार बिनधास्त सुरू असून, गुटखा विक्री थांबवायच्या फक्त घोषणा पुरताच मर्यादित राहिल्या आहेत. रेल्वेसारख्या उच्चस्तरीय वाहतूक व्यवस्थेमध्ये गुटख्यासारखा बंदी घालण्यात आलेला पदार्थ खुलेआम विकला जातो, ही बाब धक्कादायक असून, कायद्याला सरळसरळ आव्हान देणारी आहे.
खास करून सुपर फास्ट एक्सप्रेसमधून गुटखा विक्री होत असल्याचे समोर आले आहे. गुटखा खाऊन खिडकीतून बाहेर थुंकण्यातून छोटे वाद देखील निर्माण होतात. या रेल्वेमधील गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, गुटखा विक्री होत असलेल्या प्रमुख एक्सप्रेस रेल्वेमध्ये अचानक छापे टाकण्यासाठी रेल्वे पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB), आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यासह संयुक्त गस्त पथकाची स्थापना करून विक्रेत्यांना जरब बसेल अशी कारवाही करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात बाहेरून निर्यात होत असलेला गुटखा मोठ्या प्रमाणात जप्त केला जातो, पण त्याची विक्री थेट रेल्वेत सुरू राहते याचा अर्थ काय? गुन्हेगारांना पाठीशी घालणारे यंत्रणा निष्क्रिय आहेत का?” असा थेट सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गुटख्याच्या खुलेआम विक्रीवरून उद्भवलेली गंभीर स्थिती लक्षात घेता, पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी ठोस व तत्काळ भूमिका घेणे आवश्यक आहे.