(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यालगत फळे, भाजीपाला, मासळी व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून आगामी आर्थिक वर्षात रत्नागिरी नगर परिषदेला २० लाख ८२ हजार ७३९ रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. विविध बाजारपेठांमधील फी वसुलीचे मक्ते खुल्या लिलाव प्रक्रियेत निश्चित करण्यात आले असून, संबंधित मक्तेदारांकडून लिलावाची संपूर्ण रक्कम नगर परिषदेकडे जमा झाल्यानंतरच त्यांना फी वसुलीची अधिकृत परवानगी दिली जाणार आहे.
मंगळवारच्या आठवडी बाजारातील फी वसुलीच्या मक्त्यासाठी सात मक्तेदारांनी स्पर्धात्मक बोली लावली. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ३ हजार ५८३ रुपयांची बोली लावणाऱ्या मक्तेदाराच्या नावावर हा मक्ता निश्चित करण्यात आला. माळनाका ते कोकणनगर, साळवी स्टॉप, नाचणे तसेच मारुती मंदिर परिसरातील भाजी व मासळी बाजारातील फी वसुलीसाठी पाच मक्तेदारांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ४ लाख ३० हजार ९११ रुपयांची सर्वोच्च बोली स्वीकारण्यात आली. तर माळनाक्याच्या खालच्या भागातील विविध बाजारपेठांमधील फी वसुलीच्या मक्त्यासाठी चार मक्तेदार रिंगणात उतरले होते. या गटासाठी १२ लाख ४८ हजार २४५ रुपयांची सर्वाधिक बोली अंतिम करण्यात आली.
दरम्यान, शनिवारच्या आठवडी बाजारासह बाजारपेठेतील मासळी मार्केटच्या फी वसुलीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले मक्तेदार पात्रतेच्या निकषांमध्ये अपात्र ठरल्याने या दोन्ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आल्या. यापूर्वी काही मक्तेदारांनी लिलावाची संपूर्ण रक्कम वेळेत जमा न केल्याने नगर परिषदेला कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्या अनुभवाची दखल घेत सर्वसाधारण सभेने यंदा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संबंधित मक्तेदाराकडून लिलावाची संपूर्ण रक्कम एकरकमी नगर परिषदेकडे जमा झाल्याशिवाय फी वसुलीच्या पावत्या देण्याची अथवा वसुली सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
नगर परिषदेच्या या निर्णयामुळे महसूल वसुलीमध्ये पारदर्शकता वाढण्याबरोबरच भविष्यातील आर्थिक व कायदेशीर अडचणी टाळण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. संबंधित मक्ते हे एक वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

