(कोल्हापूर)
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात दरवर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम ठेवत सोमवारी तिरुपतीहून आलेला शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.
देवस्थान समितीच्या कार्यालयात पारंपरिक रीतीरिवाजांनुसार शालूचे पूजन करून तो आई अंबाबाईला अर्पण करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी व समितीचे प्रशासक अमोल येडगे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन तसेच तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
लाखो रुपयांचा मानाचा शालू
तिरुपती देवस्थानकडून पाठविण्यात आलेल्या या शालूची किंमत तब्बल १ लाख ६६ हजार १०० रुपये इतकी आहे. गुलाबी काठ असलेला पिस्ता रंगाचा हा शालू तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन बी. आर. नायडू यांच्या हस्ते देवीला अर्पण करण्यात आला. दरवर्षी नवरात्रोत्सवात हा मानाचा शालू अर्पण करण्याची परंपरा आजही जोपासली जाते.
सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी मंदिर परिसरात दाखल झाले. शालूसोबत प्रसादरूपाने तिरुपतीचे प्रसिद्ध लाडू, फळं आणि फुलांचा हारही देवीला अर्पण करण्यात आला. देवस्थान समितीतर्फे या मानाच्या शालूचं स्वागत अंबाबाई देवीची प्रतिमा, शाल व प्रसाद देऊन करण्यात आलं. या वेळी आमदार व्ही. प्रशांती रेड्डी, खासदार धैर्यशील माने, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
नवरात्रोत्सवात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सलग सुट्ट्यांमुळे नवरात्रोत्सवात कोल्हापूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रविवारीच तब्बल २ लाख ४५ हजार भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. सोमवारीही दर्शनासाठी मुख्य रांगेत मोठी गर्दी होती. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी सोमवारी आई अंबाबाईची महाविद्या श्री महाकाली स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. महाविद्या महाकालीची उत्पत्ती अष्टमीला झाल्याचे मानले जाते. ही पूजा श्रीपूजक अविनाश मुनीश्वर, विनय चौधरी, उमेश सांगावकर, नारायण आणि विजय माजगावकर यांच्या हस्ते संपन्न झाली.

