(रत्नागिरी)
रत्नागिरी येथील फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्पृहा भावे हिने ‘होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’च्या अंतिम फेरीत स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून अंतिम फेरीसाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
तिच्या या यशाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. फाटक हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात स्पृहाच्या यशाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, तालुकाप्रमुख श्री. संदेश नरगुडे, शाखाप्रमुख श्री. प्रसाद रायंगणकर तसेच कार्यकर्ता कु. चैतन्य निंबाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक कीर सर, उपमुख्याध्यापक जोशी सर, पर्यवेक्षिका शेट्ये मॅडम, तसेच चवेकर सर, सावर्डेकर सर, आग्रे सर आणि जोशी मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या वतीने युवासेनेचे आभार व्यक्त करण्यात आले.
मुख्याध्यापकांनी स्पृहाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले, तर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी संघटना नेहमीच ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला. स्पृहाच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तिचे अभिनंदन होत आहे.

