(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील बाव नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या आड मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळूउपशामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नदीचे नैसर्गिक संतुलन ढासळत असताना आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गदा येत असतानाही खनिकर्म विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे तसेच खनिकर्म विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून बाव नदीपात्रातील बेकायदा उपशाचा तपशील मांडला आहे. तक्रारीनुसार, मावळेश्वर येथून उगम पावणाऱ्या बाव नदीत ऑक्टोबर २०२५ पासून नियोजनबद्ध पद्धतीने वाळू काढली जात असून, हे संपूर्ण काम रात्री ६ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू असते. जेसीबी, ट्रॅक्टर आणि अवजड डंपरच्या सहाय्याने हा उपसा सुरू असून, एवढ्या मोठ्या प्रमाणातील हालचालींकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष कसे होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, अवैध वाळूउपशामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर दगडांचे ढीग निर्माण झाले आहेत. पूर्वी १० ते १२ फूट खोल असलेले डोह आता जवळपास कोरडे पडण्याच्या स्थितीत आले असून, अनेक ठिकाणी केवळ गुडघाभर पाणी उरले आहे. नदीचे नैसर्गिक प्रवाहमार्ग बदलत असल्याने आगामी पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या लगतच सुरू असलेला हा उपसा पर्यावरणासाठीही धोकादायक ठरत आहे. वन्य प्राण्यांच्या पाण्याचे स्रोत कमी होण्याची शक्यता असून, नदीवर अवलंबून असलेल्या भोई समाजाच्या मासेमारी व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे. आधीच घटलेली मासळी आणि कमी झालेले पाणी यामुळे अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही खनिकर्म विभाग केवळ कागदी नोंदींपलीकडे सरकत नाही. रात्रीच्या वेळी सुरू असलेला हा खुलेआम उपसा थांबवण्यासाठी संयुक्त छापेमारी, वाहने जप्ती आणि गुन्हे नोंदविण्याची कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाच्या प्रती मंत्रालयातील अपर मुख्य सचिव (खनिकर्म) तसेच कोकण भवन येथील संबंधित विभागालाही पाठविण्यात आल्या असून, आता जिल्हा प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करते की पुन्हा एकदा वाळू माफियांनाच मोकळे रान मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

