(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लांजा येथील कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला सोन्याचे दागिने स्वस्तात देण्याचा बहाणा करून बनावट दागिने देत साडेतीन लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वर येथे उघडकीस आला आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी बसस्थानक परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिलेश प्रकाश गुजर (वय ३३, रा. बेनी खुर्द-गुजरवाडी, ता. लांजा) यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी लांजा येथील कपड्याच्या दुकानात काम करत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी दुकानात येत आपल्याकडे असलेले सोने विकायचे असल्याचे सांगितले. आर्थिक अडचणीचा दाखला देत त्यांनी दागिने कमी किमतीत देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या व्यवहारावर दोघांत सौदा ठरला. यानुसार, संबंधित व्यक्तींनी दिलेश गुजर यांना संगमेश्वर बसस्थानकाजवळ बोलावले. ठरल्याप्रमाणे २८ एप्रिल रोजी सकाळी गुजर तेथे पोहोचले असता, आरोपींनी जोंधळी मण्यांचे सोन्याच्या तारांत गुंफलेले दागिने दाखवून ते खरे असल्याचा विश्वास दिला. व्यवहार पूर्ण करून त्यांनी रोख रक्कम स्वीकारली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
दरम्यान, व्यवहारानंतर दागिन्यांची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला. आरोपींनी ‘गावाकडे लग्न असल्याने आर्थिक अडचणीत आहोत’ असा बनाव रचत विश्वास संपादन केला होता. तसेच खात्री पटावी म्हणून त्यांनी काही मणी नमुना म्हणून दिल्याचेही फिर्यादीने सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण देसाई पुढील तपास करीत आहेत.

