(मुंबई)
बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवी मुंबईतील Apollo Hospital CBD Belapur येथे मध्यरात्री त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार मंदा म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आणि डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस
म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी त्यांना धीर देत लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. “मंदा ताई, तुमच्या मागे तुमच्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे. चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय व्हा,” असे शिंदे यांनी सांगितल्याचे समोर आले आहे.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर सर्व वैद्यकीय तपासण्या समाधानकारक आहेत. सध्या त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून खबरदारीचा उपाय म्हणून काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी
मंदा म्हात्रे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. त्यांच्या प्रकृतीसाठी विविध मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यात येत आहे. दरम्यान, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आणि रुग्णाला विश्रांती मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने सध्या कोणालाही भेटण्यास परवानगी दिलेली नाही.
मंदा म्हात्रे या नवी मुंबईतील भाजपच्या अत्यंत प्रभावशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. या निवडणुकीत त्यांनी नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा पराभव करत मोठा राजकीय विजय मिळवला. संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली होती. मात्र, कडवी लढत देत मंदा म्हात्रे यांनी आपला मतदारसंघाचा गड कायम राखण्यात यश मिळवले.
नवी मुंबईच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या मंदा म्हात्रे यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

