( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर येथे रखडलेल्या पुलाचे काम सुरू असताना बस स्थानकासमोरील पुलाजवळ भोस्ते घाटाप्रमाणे अवघड वळणाची पुनरावृत्ती करण्यात आल्याने येथे अपघात घडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांनी गेले काही दिवस शास्त्रीपूल ते माभळे यादरम्यानच्या भयावह स्थितीकडे पूर्णता दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संगमेश्वरवासियांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरचा सोनवी पूल म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. अजूनही या पुलाचे काम मंद गतीने सुरू आहे. गेली सहा वर्षे या पुलाचे काम सुरू असून या पुलामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संगमेश्वर येथील सोनवी चौकात होणारी वाहतूक कोंडी म्हणजे सर्वांसाठीच एक तापदायक बाप ठरली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार संगमेश्वरवासीयांच्या सहनशीलतेचा यामधून अंत पहात असल्याची प्रतिक्रिया पादचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सोनवी पुलाचे काम २०२२ साली सुरु झाल्यानंतर वर्षभर रखडलेलेच होते.
संगमेश्वर येथील सोनवी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्व स्तरातील मंडळी त्रस्त झाली असतानाच आता येथील गणेश कृपा हार्डवेअरच्या समोर खेड जवळील भोस्ते घाटा मधील अत्यंत अवघड वळणाप्रमाणे पुलावर चढण्यासाठी अशाच वळणाची पुनरावृत्ती करण्यात आली असून यामुळे भविष्यात गंभीर अपघात घडण्याची भीती वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. असे अवघड वळण निर्माण करणे, टाळता येण्यासारखे असताना देखील याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे दिसून येत आहे.
ज्या ठिकाणी डायव्हर्जन केली जातात तेथील रस्ते डांबरी करणे आवश्यक असताना ते केले जात नाहीत. ठेकेदार बेजबाबदारपणे येथे खड्डे ठेवून वाहन चालकांना नाहक मनस्ताप देत असल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांचे सुपरवायझर अथवा कर्मचारी आणि कामगार स्थानिक मंडळी काही सूचना करायला गेल्यास त्यांच्याजवळ उद्धटपणे वागत असल्याचे अनुभव आले आहेत. संगमेश्वर जवळील पैसा फंड इंग्लिश स्कूल येथील उड्डाणपूलाची एक बाजू नुकतीच सुरू करण्यात आली . या पुलावर देखील धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू आहे. येथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नियम पाळले गेले नसून अत्यंत बेजबाबदारपणे ही एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे.
पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या मुलांना शाळेत जात असताना सेवा रस्त्यांचे काम पूर्ण न केल्याने जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. शाळेजवळ वाहनांना पोहोचण्यासाठी सुरक्षित मार्ग ठेवलेला नाही. याबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी पालक वर्गाने केली आहे.
शास्त्री पुल येथे कसबा या गावाकडे जाण्यासाठी आंबेडखुर्द येथील सेवा रस्त्यांचे काम पूर्ण न केल्याने राष्ट्रीय महामार्ग वरूनच कसबा येथे जाण्यासाठी तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगमेश्वर येथून कसबा ते नायरी या मार्गावर मोठी वाहतूक असून ही वाहने अचानक कसबा गावाकडे वळताना मोठा अपघात घडण्याची भीती वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंबेडखुर्द या ठिकाणी देखील डिंगणी येथून येणारी वाहने अचानक राष्ट्रीय महामार्गावर येतात त्यामुळे या ठिकाणी देखील मोठा अपघात होण्याची भीती आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी तातडीने येथील सेवा रस्ते पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
संगमेश्वर येथील वळण म्हणजे अपघातांना निमंत्रण
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथे गणेश कृपा हार्डवेअर समोर तयार करण्यात आलेले एस आकाराचे वळण, हे अत्यंत धोकादायक असून भविष्यात येथे मोठे अपघात घडण्याची भीती आहे. या ठिकाणी आम्ही आमची व्यावसायिक जागा कोणतीही तक्रार न करता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केली. असं असताना येथे ठेवण्यात आलेले एस आकाराचे हे वळण अत्यंत धोकादायक असून अजूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाला हे धोकादायक वळण कमी करण्याची अजूनही संधी आहे . याबाबत तातडीने पाहणी करून कार्यवाही व्हावी. वारंवार विनंत्या आणि सूचना करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे लक्ष देत नाही.
– दिलीप रहाटे, व्यापारी संगमेश्वर

