(पुणे)
शाळेत कराटेच्या सरावादरम्यान पोटात मार लागल्याने १० वर्षांच्या मुलीला तीव्र वेदना सुरू झाल्या. तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या स्वादुपिंडात सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम हा दुर्मीळ प्रकारचा कर्करोग असल्याचे निदान झाले. वेळेत निदान झाल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही गाठ यशस्वीपणे काढून टाकली असून मुलगी आता पूर्णपणे बरी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी नियमितपणे शाळेत जात होती आणि तिला कोणताही आरोग्यविषयक त्रास नव्हता. तिच्यात कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मात्र, शाळेत कराटेच्या सरावादरम्यान तिच्या पोटात दुखापत झाली. त्यानंतर तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला तातडीने बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीत तिच्या स्वादुपिंडात सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम या दुर्मीळ कर्करोगाची गाठ असल्याचे आढळले.
याबाबत रुग्णालयातील कर्करोगतज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की, स्वादुपिंडाच्या रचनेचा सखोल अभ्यास करून आम्ही सेंट्रल पॅनक्रिएटॉमी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे स्वादुपिंडाचा महत्त्वाचा भाग आणि लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग सुरक्षित ठेवता आला. स्वादुपिंड हा अवयव शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्याने ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होती. विशेषतः लहान मुलांमध्ये रक्तस्रावाचा धोका अधिक असतो. मात्र, अत्यंत कमी रक्तस्त्रावात गाठ सुरक्षितपणे काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रियेनंतर मुलीचे स्वादुपिंडाचे कार्यही सुरळीत राहिले आहे. सध्या ही मुलगी पूर्णपणे बरी झाली असून ती पुन्हा नियमितपणे शाळेत जाऊ लागली आहे.
तरुण महिलांमध्ये अधिक आढळणारा दुर्मीळ कर्करोग
स्वादुपिंडाचा सॉलिड स्युडोपॅपिलरी निओप्लाझम हा कर्करोगाचा अत्यंत दुर्मीळ प्रकार आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगांपैकी याचे प्रमाण केवळ १ ते ३ टक्के इतके आहे. हा कर्करोग प्रामुख्याने २० ते ३० वयोगटातील तरुण महिलांमध्ये आढळतो. मात्र, या प्रकरणात अवघ्या १० वर्षांच्या मुलीमध्ये हा कर्करोग आढळल्याने ते वैद्यकीय दृष्ट्या दुर्मीळ मानले जात आहे. रुग्णालयाच्या दाव्यानुसार, देशातील या प्रकारच्या कर्करोगाची ही सर्वांत कमी वयाची रुग्ण असू शकते.
वेळेत निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया यामुळे या मुलीचे प्राण वाचले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत आहे.

