(नवी दिल्ली)
पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण संघर्षाचा १८ वा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी सिलिंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलिंडरचे बुकिंग करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारने नागरिकांना घाईघाईने सिलिंडर बुकिंग करू नये असा सल्ला मंगळवारी दिला. सरकारच्या माहितीनुसार देशात सध्या पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे आणि पुरवठा सुरळीत सुरू आहे.
पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पुरेसा
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, बंदरे-जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद घेतली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव (विपणन व तेल शुद्धीकरण) सुझाता शर्मा यांनी सांगितले की, देशात कच्च्या तेलाची उपलब्धता सामान्य आहे आणि पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सुरू आहे.
नागरिकांनी घाबरून LPG बुकिंग करू नये
एलपीजी सिलिंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या अफवांमुळे अनेक ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात सिलिंडर बुकिंग करत आहेत. मात्र सरकारने स्पष्ट केले की घाबरून सिलिंडर साठवण्याची गरज नाही. सुझाता शर्मा यांनी सांगितले की, व्यावसायिक एलपीजी ग्राहकांनी शक्य असल्यास पीएनजी (PNG) गॅसकडे वळल्यास घरगुती वापरासाठी अधिक गॅस उपलब्ध राहू शकतो.
काळाबाजार आणि बेकायदेशीर साठवणुकीवर कारवाई
एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांत सुमारे १२ हजार छापे टाकण्यात आले असून जवळपास १५ हजार सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
- दिल्लीमध्ये सुमारे ६०० सिलिंडर जप्त
- उत्तर प्रदेशात ४५० तपासण्या आणि छापे, १० जणांना अटक
- जम्मू-काश्मीरमध्ये ५६४ छापे, एफआयआर नोंद
- केरळमध्ये जवळपास १००० तपासण्या
- मध्य प्रदेशात १२०० छापे, सुमारे १८०० सिलिंडर जप्त
याशिवाय तेल विपणन कंपन्यांची तपासणी पथके सक्रिय असून देशभरातील २५०० एलपीजी वितरक आणि पेट्रोल पंपांवर अचानक तपासणी सुरू आहे.
भारतात LPG वाहून आणणारी जहाजे पोहोचली
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडे येणाऱ्या एलपीजी पुरवठ्यावरही लक्ष ठेवले जात आहे. मंगळवारी भारताचे दुसरे एलपीजी वाहक जहाज ‘नंदा देवी’ वडीनार बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले. या जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी पार करून ४६,५०० मेट्रिक टन एलपीजी भारतात आणला आहे. यापूर्वी ‘शिवालिक’ हे एलपीजी जहाज सोमवारी मुंद्रा बंदरात पोहोचले होते.
भारतीय खलाशी सुरक्षित
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले की आखाती प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी आणि जहाजे सुरक्षित आहेत. गेल्या २४ तासांत १६१ भारतीय खलाशांना भारतात परत आणण्यात आले असून हे काम भारतीय दूतावासांच्या समन्वयाने करण्यात आले आहे.
सरकारच्या मते, सध्या देशातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून गॅस सिलिंडर साठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

