( चिपळूण )
चिपळूण–गुहागर मार्गावरील मिरजोळी येथील ब्रिटिशकालीन पूल सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून तो धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. पुलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
गुहागर–विजापूर हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरील मिरजोळी येथील पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. अनेक वर्षांपासून हा पूल वाहतुकीचा प्रमुख दुवा राहिला आहे. मात्र दीर्घकाळ देखभाल न झाल्याने पुलाची रचना कमकुवत झाली असून सध्या त्याची अवस्था चिंताजनक बनली आहे.
या मार्गावरून दररोज टँकर, डंपर, ट्रक, एसटी बस तसेच लहान-मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. वाढत्या वाहतुकीच्या ताणामुळे पुलाची झीज अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलावरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रहिमान दलवाई यांनी म्हटले आहे की, पुलाची अवस्था अत्यंत गंभीर आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल उभारण्याचा निर्णय घ्यावा.
दरम्यान, पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

