(खेड / रत्नागिरी)
तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत उघडकीस आलेल्या तब्बल ४ कोटी २२ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोन संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बुधवार (१० सप्टेंबर) रोजी या अर्जांवर झालेली सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गुरुवार (११ सप्टेंबर) रोजी आदेश देण्यात आला. उपाध्यक्ष सुधाकर रामभाऊ शिंदे आणि सुभाष भिकू शिंदे या दोघांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. दरम्यान, माजी उपाध्यक्ष शशिकांत नथुराम शिंदे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवार, ११ सप्टेंबरला होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात येऊन आता मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, १६ संशयितांपैकी अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया सुतार आणि सुभाष शिंदे या पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने ३० ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यांना सुरुवातीला ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर त्यांची पुन्हा कोठडी वाढविण्यात आली आहे.
लेखापरीक्षणात ३ कोटी ७९ लाखांचा अपहार आणि ४३ लाख रुपयांच्या बनावट ठेवी पावत्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. ठेवीदारांना वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला. सध्या अटकेत पाच आरोपी असून, उर्वरित संशयितांवरही अटकेची टांगती तलवार आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर इतर संशयितांच्या अटकेच्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

